www.24taas.com, बंगळुरू
ईशान्येकडील लोकांना मिळणाऱ्या धमक्यांमुळे आणि छोट्या-मोठ्या हिंसेमुळे अफवांना चांगलंच पेव फुटलंय. धमक्यांमुळे बंगळुरू, पुणे, चेन्नई, हैद्राबाद आणि गोवायांसारख्या ठिकाणांवरून ईशान्य भागातील लोकांनी आपल्या राज्यात परतण्याचा मार्गच योग्य वाटतोय. फक्त तीन दिवसांत फक्त कर्नाटकहून ३० हजार लोकांनी पलायन केलंय आणि या संख्येत अजूनही वाढ होणार असंच चित्र आहे.
कर्नाटकची राजधानी बेंगळुरूसोबतच म्हैसूर, मंगलोर आणि कोडागू या भागांतूनही ईशान्य भारतीयांनी लोकांनी घरचा रस्ता धरलाय. याच दरम्यान, अफवा पसरवण्याच्या आरोपावरून आत्तापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आलीय. तसंच इतर चार जणांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलंय.
आसामसहित ईशान्येकडील इतर राज्यांतील लोकांचं कर्नाटकहून पलायन रोखण्यासाठी शुक्रवारी आसामचे दोन मंत्री कर्नाटकात दाखल झाले होतं. त्यांनी कर्नाटकचे गृहमंत्री आर. अशोक यांची भेट घेतली. इतकंच नाही तर त्यांनी रेल्वे स्टेशनवर जाऊन नागरिकांना शहर न सोडण्याचं आवाहनदेखील केलं.
कर्नाटक सरकारनंदेखील हे स्थलांतर थांबवण्यासाठी तातडीनं पावलं उचलण्याचं ठरवलंय. शहरांतील विविध भागांत ‘रॅपिड अॅक्शन फोर्स’च्या सहा टीम्स म्हणजेच जवळजवळ ७५९ सुरक्षा अधिकारी तैनात करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय.