नवी दिल्ली : तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि अण्णा द्रमुकचे बंडखोर नेते ओ. पनीरसेल्वम यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
यावेळी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी पनीरसेल्वम यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. पक्षाचे दहा खासदार, नऊ आमदार भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देतील, असे मोदींनी सांगितले. तसेच तमिळनाडूमधील सद्य राजकीय परिस्थितीवरही या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
पनीरसेल्वम यांच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रपतीपद निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणा-या प्रादेशिक पक्षांची संख्या तीनवर गेली आहे. याआधी वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी यांनी भाजपला पाठिंबा दिलाय.
तेलंगणा राष्ट्र समितीचे नेते ए. पी. जितेंद्ररेड्डी यांनीही भाजपच्या बाजूने असल्याचे संकेत दिलेत. याशिवाय तमिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीसामी हेसुद्धा भाजपाला पाठिंबा देण्यात तयार असल्याची माहिती मिळत आहे.