मुंबई : तब्बल २ कोटी ५० लाख रुपयांचा मालक कोण आहे? याचा शोध सध्या सुरू आहे.
ही अवाढव्य राशी ऑनलाईन लॉटरी ‘प्लेविन’च्या विजेत्याला मिळणार आहे... पण, हा विजेता नक्की आहे तरी कोण? याचा मात्र पत्ता लागत नाहीय. सिक्कीम सरकारकडून प्लेविन लॉटरी चालविली जाते.
एका वर्तमानपत्रानं दिलेल्या बातमीनुसार, दोन आठवड्यांपूर्वी ‘प्लेविन’नं आपल्या ‘स्वीपस्टेक’मध्ये विजेत्याच्या नंबरची घोषणा केली होती. परंतु, या अवाढव्य राशीचा कोणताही दावेदार अद्याप समोर आलेला नाही.
पुण्यातील सोमवार पेठ स्थित शाह ऑनलाईन लॉटरीमध्ये याचं तिकीट खरेदी करण्यात आलंय. स्टोअरचे मालक संदीप शाह यांच्या म्हणण्यानुसार, हे तिकिट निकाल घोषित होण्याअगोदर दोन दिवसांपूर्वी कुणीतरी विकत घेतलं होतं.
शनिवारी सुपर लोट्टो ड्रॉची घोषणा झाली. स्टोअर मालकांच्या म्हणण्यानुसार, अद्याप तो भाग्यशाली विजेत्यानं त्यांना कॉन्टॅक्ट केलेला नाही... आपण, ग्राहकांना नेहमी तिकीट सांभाळून ठेवण्याचा सल्ला देतो त्यामुळे बक्षीस मिळण्यासाठी कोणतेही प्रश्न निर्माण होत नाहीत, असंही त्यांनी म्हटलंय.
प्लेविन मार्केटिंग हेड पवन टांगरी यांच्या ‘त्या’ भाग्यशाली विजेत्याला समोर येऊन आपलं स्वप्न पूर्ण करण्याचं आवाहन केलंय. यासाठी, ९० दिवसांचा अवधी देण्यात आलाय. त्यानंतर मात्र ही रक्कम सिक्कीम सरकारकडे परत जाईल. त्यानंतर ही राशी कल्याणकारी योजनांसाठी वापरण्यात येईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.