www.24taas.com, झी मीडिया, लखनौ
उत्तर प्रदेशच्या आयएएस अधिकारी दुर्गाशक्ती नागपाल यांचं निलंबन अखेर उत्तर प्रदेश सरकारने मागे घेतलंय. निलंबनाचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने रद्द केलाय. दुर्गा शक्ती नागपाल यांनी काल त्यांच्या पतीसह मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची भेट घेतली होती. २७ जुलैला एका प्रार्थनास्थळाची अनधिकृत भिंत पाडल्याची कारवाई केल्याबद्दल उत्तर प्रदेश सरकारने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. त्यांच्या निलंबनावर देशभरात संताप व्यक्त झाला होता.
वाळू माफियांविरुद्ध जोरदार कारवाई करत त्यांचे सर्व अवैध व्यवहार ठप्प केल्याने वाळू माफियांची मक्तेदारी संपुष्टात येत होती. मात्र, या वाळू माफियांना सरकारनेच अभय देण्याचा उद्योग सुरू ठेवल्याचे पुढे आलेय. वाळू माफियांविरुद्ध लढणाऱ्या आयएएस महिला अधिकारी यांना चक्क निलंबित करण्यात आले आहे.
वाळू माफियांविरुद्ध नागपाल यांनी कारवाई करत अवैध व्यवहार ठप्प बंद केलेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात वाळू माफिया सक्रीय झाले होते. अखेर रविवारी सरकारकडून त्यांना निलंबनाची नोटीस देण्यात आली होती. दरम्यान, वाळू माफियांवरील कारवाईबरोबरच नागपाल यांनी शनिवारी ग्रेटर नोएडा परिसरात सरकारी जमिनीवर अवैधरित्या उभारण्यात आलेली मशीद पाडण्याचे आदेश दिले होते. या निर्णयामुळेच त्यांना निलंबित करण्यात आल्याचे, उत्तर प्रदेश सरकारकडून सांगण्यात येत आहे. त्यांचा हा वादग्रस्त निर्णय असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.