www.24taas.com, नवी दिल्ली
काही दिवसांपूर्वीच भगव्या आतंकवादाचे आपल्याकडे पक्के पुरावे असल्याचं म्हणणाऱ्या काँग्रेस सरकारने नुकतीच बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनांची यादी जाहीर केली. पण, गंमत म्हणजे यात एकाही हिंदुत्ववादी संघटनेचं नाव नाही. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्र्यांनी केलेलं विधान कुठल्या आधारावर केलं होतं, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी आपल्या भाषणात हिंदू आतंकवादी असा उल्लेख करून खळबळ माजवली होती. त्यानंतर हिंदूऐवजी भगवा दहशतवाद अशी फेरफारही आपल्या वक्तव्यात केली होती. यावर पक्के पुरावे असल्याचं अनेक काँग्रेस नेत्यांनी म्हणत सुशीलकुमार शिंदेंची पाठराखणही केली. मात्र, प्रत्यक्षात जेव्हा बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत बंदी घातलेल्या ३५ संघटनांची यादी जाहीर केली, तेव्हा त्यात एकाही हिंदुत्ववादी संघटनेचं नाव नाही.
नुकत्याच वेबसाइटवर जाहीर केलेल्या दहशतवादी संघटनांच्या यादीत १३ इस्लामी संघटना, खलिस्तान कमांडो फोर्स, खलिस्तान झिंदाबाद फोर्स, शीख इंटरनॅशनल शीख युथ फेडरेशन यासारख्या ४ शीख खलिस्तानी संघटना, ३ माओवादी संघटना आणि दहा ईशान्य भारतातील आतिरेकी संघटनांवर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय तामिळनाडू लिबरेशन आर्मी, तामिळ नॅशनल रिट्रिव्हल ट्रूप, लिबरेशन टायगर ऑफ तामिळ इलम या संघटनांचा समावेश आहे. मात्र यातील एकही संघटना हिंदुत्ववादी नाही. त्यामुळे सुशीलकुमार शिंदेंनी केलेल्या वक्तव्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.