नवी दिल्ली : नवी दिल्ली ते आग्रा... हा प्रवास केवळ ९० मिनिटांत गाठणाऱ्या सेमी हायस्पीड ट्रेनचं येत्या गुरुवारी ट्रायल होणार आहे.
१६० किलोमीटर प्रती तास वेगानं चालणाऱ्या या ट्रेनचं उद्घाटन याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात करण्यात येण्याची शक्यता आहे. सध्या नवी दिल्ली ते आगरा पोहचण्यासाठी भोपाळ-शताब्दी एक्सप्रेस १५० किलोमीटर प्रती तास वेगानं चालते. या ट्रेनला हे अंतर पार करण्यासाठी जवळपास १२० मिनिटांचा वेळ लागतो.
५४०० एचपीच्या इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह आधारीत या ट्रेनचं ट्रायल गुरुवारी सकाळी दहा वाजता नवी दिल्ली स्टेशनहून होणार आहे. कमिशनर रेल्वे सेफ्टी पी.के.वाजपेयी आणि दिल्ली - आगराचे डिव्हिजनल मॅनेजर यांच्यासोबतच वरिष्ठ अधिकारीही या ट्रायलसाठी उपस्थित राहणार आहेत.
या स्पेशल ट्रेनला १० कोच आहेत. गुरुवारीच दिल्लीहून आग्र्यासाठी निघणारी ही ट्रेन ९० मिनिटांत आग्र्याला पोहचून त्याच दिवशी पुन्हा दिल्लीत दाखल होईल.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हायस्पीड ट्रेनसाठी तयार करण्यात आलेल्या ट्रॅकसाठी जवळपास १५ करोडोंचा खर्च करण्यात आलाय. हा प्रोजेक्ट यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर दिल्लीहून कानपूर आणि चंदीगडसाठीही अशाच स्पेशल रेल्वे सुरु करण्यात येतील.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.