नवी दिल्ली: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूबाबतचं गूढ दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. केंद्र सरकारनं नेताजींबाबतच्या फाईल्स टप्प्या टप्प्यानं सार्वजनिक करायचा निर्णय घेतला.
यानंतर मंगळवारी काही फाईल्स सार्वजनिक करण्यात आल्या. नेताजी 1945 मध्ये झालेल्या विमान दुर्घटनेमध्ये वाचल्याचे संकेत या फाईल्समध्ये देण्यात आले आहेत.
18 ऑगस्ट 1945 म्हणजेच ज्या दिवशी तैपईमध्ये विमान अपघात झाल्याचं सांगितलं जातं, त्यानंतर नेताजींनी 3 वेळा रेडिओच्या माध्यमातून देशाला संबोधित केलं, असा उल्लेख या फाईल्समध्ये करण्यात आला आहे.
26 डिसेंबर 1945, 1 जानेवारी 1946 आणि फेब्रुवारी 1946 अशा तीन वेळा नेताजी बोलले असल्याचा दावा या फाईल्समध्ये करण्यात आला आहे.
मी जगभरातल्या ताकदवानांच्या छत्रछायेखाली आहे. माझं मन भारतासाठी रडत आहे. विश्व युद्ध जेव्हा सुरु होईल, तेव्हा मी भारतात जाईन. पुढच्या दहा वर्षांमध्ये ही वेळ येईल. तेव्हा मी लाल किल्ल्यातून जे लोक माझ्या लोकांविरोधात खटले चालवत आहेत, त्यांच्याविषयी निर्णय घेईन. हा नेताजींचा पहिला संदेश आहे.
1 जानेवारी 1946 ला नेताजींनी दुसरा संदेश दिला. भारताला पुढच्या 2 वर्षांमध्ये स्वातंत्र्य मिळेल. ब्रिटिशांचा साम्राज्यवाद तुटलेला आहे त्यामुळे त्यांना भारताला आझाद करावंच लागेल. भारत अहिंसेमुळे स्वतंत्र होणार नाही, तरीही मी गांधीजींचा सन्मान करतो, असं नेताजी म्हणाले.
तर जपानमध्ये आत्मसमर्पण केल्यानंतर मी भारतातल्या माझ्या बहिण आणि भावांशी तिसऱ्यांदा संवाद साधत आहे, असं नेताजी फेब्रुवारी 1946मध्ये म्हणाले.