नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी अखेर उत्तर प्रदेशमध्ये पक्षाला ऐतिहासिक यश मिळवून देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय अमित शाह यांची निवड निश्चित झाली आहे. भाजपच्या संसदीय बोर्डाच्या आज होणा-या बैठकीत त्यांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे.
अमित शाह यांच्याकडे पक्षाची धुरा सांभाळण्याचा निर्णय भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं का घेतलाय? हा सर्वात मोठा सवाल आहे. या शर्यतीत तीन नावं होती. पण शाह यांच्याच नावावर मोदी आणि संघाचं शिक्कामोर्तब का झालं? त्याची कहाणी सुरू होते उत्तर प्रदेशातून... उत्तर प्रदेशातील ऐतिहासिक विजयानं मोदींच्या या सारथीला महारथी बनवण्यात महत्त्वाचं योगदान दिलं.
अमित शहा म्हणजे मतांचा शहेनशहा.. जिथं भाजपला विजयाची आस तिथं तिथं अमित शाह.. हे असे काही वाक्यप्रचार आहेत जे २०१४च्या लोकसभा निवडणुकांनंतर अमित शहा यांच्यावर तंतोतंत लागू होतायत.
देशात मोदी लाट आली असताना मोदींचे विश्वासू सहकारी अमित शाह यांनी उत्तर प्रदेशात भाजपच्या झोळी मतांनं भरण्यात सिंहाचा वाटा उचलला. वाराणसीत मोदींच्या विजयासाठी अमित शाह यांनी तन मन धन अर्पण केलं.
भाजपसाठी हा पहिला क्षण होता ज्यावेळी पक्षानं उत्तर प्रदेशात ८० पैकी ७१ जागांवर स्वबळावर विजय मिळवला तर २ जागांवर मित्रपक्षाच्या मदतीने विजयोत्सव साजरा केला.
हे सारं घडलं ते अमित शाह यांची मेहनत आणि चाणक्यनीतीमुळे.. निवडणुक प्रचार समितीचं प्रमुखपद मिळाल्यानंतर ४ दिवसांतच मोदींनी१२ जून २०१३ रोजी अमित शाह यांच्या खांद्यावर उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवली. १० महिन्यांतच शाह यांनी पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये असा काही उत्साह आणला की उत्तरप्रदेशात २००९मध्ये १० जागा असणा-या भाजपनं यंदा ७१जागा जिंकल्या.
पक्षाला नव्या शिखरावर पोहचवण्यासाठी अमित शाह यांनी कठोर निर्णय घेतले. उत्तर प्रदेशात स्वतः रणनिती आखली. जय-पराजय आणि जातीची समीकरणं लक्षात घेऊन टिकीट वाटपाचा निर्णय घेतला.. ज्येष्ठ भाजप नेते मुरली मनोहर जोशी यांच्याऐवजी वाराणसीतून मोदींना मैदानात उतरवण्याचा निर्णयसुद्धा अमित शाह यांचाच. शिवाय कलराज मिश्रा यांनासुद्धा लखनऊऐवजी देवरिया सीटवर तिकीट देण्याचा निर्णयही अमित शाह यांचाच. शाह यांच्या निर्णयांमुळे पक्षातले अनेक ज्येष्ठ नेते दुखावले गेले. मात्र निवडणुकांचे निकाल विरोधकांची नाराजी दूर करण्यासाठी पुरेसे होते.
आता अमित शाह यांच्या खांद्यावर पक्षाची धुरा सोपवून पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशच्या विजयाची पुनरावृत्ती करण्याचं भाजपचं ध्येय आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.