नवी दिल्ली : भारताला आणि पर्यायानं पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुश करण्याची एकही संधी सोडण्यास ऑस्ट्रेलिया तयार नाही, असंच दिसतंय. कारण, 2002 साली गुजरातमध्ये झालेल्या दंगलींसाठी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबॉट यांनी मोदींना क्लिन चिट दिलीय.
या प्रकरणी मोदींची असंख्य वेळा चौकशी झालीय आणि त्यात ते दोषी आढळलेले नाहीत. ही गोष्ट आपल्याला पुरेशी वाटते, असं अॅबॉट म्हणाले. आपण खुर्चीत असतो आणि तेव्हा नेमकं काहीतरी घडतं, तेव्हा दरवेळी त्या खुर्चीत बसलेल्या व्यक्तीलाच जबाबदार धरणं अयोग्य असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
‘या प्रकरणासंबंधी अगणित चौकशी पार पडल्यात आणि त्यामध्ये श्री मोदी नेहमीच निर्दोष असल्याचं स्पष्ट झालंय. माझ्यासाठी निश्चित रुपात हे पुरेसं आहे’ असं यावेळी अॅबॉट यांनी म्हटलंय.
द्विपक्षीय संबंधांना दृढ करण्याच्या दृष्टीनं भारत दौऱ्यावर आलेल्या अॅबॉट यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून मोदींनी दोन वेळा केलेले ऑस्ट्रेलिया दौऱ्यांचीही आठवण काढली. ऑस्ट्रेलियात मोदींचे अनेक चाहते असल्याचं सांगत मोदी आणि बदलेल्या सरकारमुळे तिथं राहणाऱ्या पाच लाख भारतीय समुदायात उत्साह असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.