नवी दिल्ली : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. हा विस्तार होत असताना अनेकांची गच्छंती होण्याची शक्यता आहे. मात्र, उत्तर प्रदेशमधील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दलिल व्होट मिळविण्यासाठी महाराष्ट्रातून रामदास आठवले यांनी वर्णी लागण्याची शक्यता आहे.
भाजपने उत्तर प्रदेशात निवडणुकीत दलित मतदार आपल्याकडे खेचण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळात दलित मंत्री देण्याचा विचार केल्याचे दिसत आहे. त्यामुळे रामदास आठवले यांना मंत्रीपद देण्यासाठी प्रयत्न आहे. मात्र, आठवले यांना जरी मंत्रीपद दिले तरी उत्तर प्रदेशात पक्षाला किती फायदा होईल, हाही प्रश्नच आहे.
गेले काही दिवस केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा होती. अखेर मुहूर्त सापडला असून, मंगळवारी सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर राजधानी नवी दिल्लीमध्ये हालचालींना वेग आला आहे. एकामागून एक नेते भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या भेटीसाठी येत आहेत.
भाजपचे धुळ्याचे खासदार सुभाष भामरे, राज्यसभेतील सदस्य विनय सहस्त्रबुद्धे, सांगलीचे खासदार संजयकाका पाटील, जळगावचे खासदार ए. टी. नाना पाटील यापैकी एक किंवा दोघांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. मंत्रिपदासाठी हट्ट करणारे रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनाही मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते. या सर्वांनी अमित शहा यांची भेट घेतली. त्यामुळे शहा यांची ज्यांनी भेट घेतली आहे, त्यांना मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात १० नव्या मंत्र्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. मोदींनी गुरूवारी स्वत: सर्व मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेतला होता. या बैठकीनंतर मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाच्या चर्चेला उधाण आले. उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता तेथील किमान दोन मंत्र्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
ऊर्जा मंत्री पियूष गोयल, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला जाऊ शकतो. केंद्रीय खते आणि रसायने राज्यमंत्री निहाल चंद यांना मंत्रिमंडळातून बाहेर जावे लागू शकते. तर त्याचवेळी राजस्थानमधील पक्षाचे नेते अर्जुन मेघवाल यांना मंत्रिपदाची संधी दिली जाऊ शकते.
उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्याचे कृषी राज्यमंत्री संजीव बलयान यांना पदोन्नती देऊन त्यांच्याकडे मंत्रिपदाचा स्वतंत्र कार्यभार सोपविण्यात येऊ शकतो. तसेच महाराष्ट्रातून रामदास आठवले यांनी मंत्रीपद मिळू शकते. त्याचबरोबर अपना दल पक्षाच्या खासदार अनुप्रिया पटेल यांनाही मंत्रिमंडळा संधी आहे.