नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाडेकरुंसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. तुम्ही भाड्याच्या घरात राहा आणि कालांतराने त्याच घराचे मालक व्हा, अशी ही नवी योजना आहे.
२०२२ पर्यंत देशातील प्रत्येक नागरिकाला हक्काचं घर देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्यांचं हे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्रीय नगरविकास खात्यानं एक महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे.
'रेंट टू ओन' नावाच्या या योजनेनुसार, विविध कारणांनी शहरात येणाऱ्यांना सरकारी संस्थेकडून भाड्याने घर घेता येणार आहे आणि कालांतराने ते सहज-सोपे हप्ते भरून त्या घराचे मालकही होऊ शकणार आहेत. तसेच खासगी जमिनीवरील घरं विकत घेण्यासाठी गरिबांना दीड लाख रुपयांचं मदत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
सध्या अशा प्रकारचं अनुदान, राज्य सरकार किंवा महापालिकांच्या मालकीच्या जमिनींवरील घरखरेदीसाठी दिली जाते. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शहर गृहनिर्माण धोरणाअंतर्गत रेंट टू ओन ही योजना राबवली जाणार आहे. ही नवी योजना केंद्रीय मंत्रिमंडळापुढे मंजुरीसाठी ठेवली जाईल, अशी माहिती केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी येथे दिली.