नक्षलवाद्यांनी पुन्हा उडवला रेल्वे रूळ, जीवितहानी नाही

भारत पुन्हा एकदा नक्षलवाद्यांच्या घातकी कारवायांनी हादरलाय. पण, सुदैवानं यावेळी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 

Updated: Jul 23, 2014, 11:57 AM IST
नक्षलवाद्यांनी पुन्हा उडवला रेल्वे रूळ, जीवितहानी नाही title=

गया : भारत पुन्हा एकदा नक्षलवाद्यांच्या घातकी कारवायांनी हादरलाय. पण, सुदैवानं यावेळी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 

बिहारमध्ये नक्षलवाद्यांनी मंगळवारी रात्री उशीरा पूर्व-मध्य रेल्वेच्या गया-मुगलसराय रेल्वे रुळांवर इस्माइलपूर-रफीगंज स्टेशनदरम्यान बॉम्बस्फोट घडवून रेल्वे रुळांना उडवून दिलंय. बॉम्बस्फोटामुळे राजधानी एक्सप्रेसच्या समोर असलेली ‘अॅडव्हान्स पायलट इंजिन’ रुळांवरून घसरली पण, अॅडव्हान्स पायलटचा इंजिन चालक मात्र सुरक्षित आहे.  

पायलट इंजिनच्या मागे थोड्याच अंतरावर धावणारी आणि प्रवाशांना भरलेली भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस थोडक्यासाठी बचावलीय त्यामुळे मोठा धोका टळलाय. या गाडीला कोणतंही नुकसान पोहचलेलं नाही. जिल्ह्याच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्य माहितीनुसार, रेल्वे ट्रॅक उडविण्याची ही घटना गया आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या मध्ये रफीगंज पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भागात घडलीय. या घटनेनंतर रेल्वे मंत्री सदानंद गौड यांनी, अधिकाऱ्यांच्या सावधानतेमुळे मोठा धोका टळल्याचं म्हटलंय.  

या घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी आणि पोलीसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली होती. हा रेल्वे ट्रॅक उडवल्यामुळे गया-हावडा रेल्वेमार्ग प्रभावित झालाय. उल्लेखनीय म्हणजे, बिहारमध्ये भाकपा माओवाद्यांनी औरंगाबाद पोलीस फायरिंगच्या विरोधात बुधवारी बिहार बंदचं आवाहन केलंय.  

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.