गडचिरोली : प्रोफेसर जी एन साईबाबासह पाच जणांना जन्मठेपेची तर एका आरोपीला 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलीय. देशाविरोधी कारवाया करत नक्षलवादी चळवळीला पाठिंबा दिल्यानं ही शिक्षा ठोठावण्यात आलीय.
नक्षल संबंध प्रकरणात शिक्षा सुनावताना न्यायालयानं गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयानं दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जीएन साईबाबा तसंच जेएनयूच्या एका विद्यार्थ्यासह सहा जणांना दोषी ठरवलंय. यापैंकी प्रो. जी एन साईबाबा, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी हेम मिश्रा तसंच पत्रकार प्रशांत राही, महेश तिरकी, पांडू नरोटे यांना जन्मठेपेची शिक्षा तर विजय तिरकी याला 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय. एकूण सहा जणांवर नक्षलींना साथ दिल्याचा आरोप होता. हा आरोप न्यायालयात सिद्ध झालाय.
नक्षल चळवळीशी संबंध असल्याचा कारणावरून गडचिरोली पोलिसांनी ९ मे २०१४ रोजी साईबाबाला अटक केली. नक्षल चळवळींचे केंद्र असलेल्या अबूजमाड भागात वरीष्ठ नक्षली नेत्यांना भेटण्यासाठी साईबाबा येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून साईबाबाला अटक केली होती.
साईबाबा याच्या अटकेआधी पोलिसांनी एक पत्रकार, एक विद्यार्थी आणि अन्य काही शहरी कार्यकर्त्यांना अटक करत साईबाबा पर्यंतचा मार्ग शोधला होता.
अटकेच्या वेळी साईबाबाजवळ आढळलेले दस्तावेज, लॅपटॉप यावरून पोलिसांनी साईबाबाविरोधात भक्कम केस उभी केली होती. त्यानुसार त्याच्या जामिनाचा मार्ग कठीण झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी साईबाबा यांच्यासह अन्य ६ आरोपींविरोधात UAPA (unlawful activities prevention act) सारखे गंभीर गुन्हे दाखल करत साईबाबाला न्यायालयात सादर केले होते.