मोदी तोंडावर; गुजरातपेक्षा महाराष्ट्राच्या टोलची कमाई जास्त!

‘बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स’मध्ये नुकतंच मोदींनी आपल्या भाषणात महाराष्ट्र सरकारवर टीका करत जोरदार टाळ्या मिळवल्या. पण, या सभेसाठी मोदी मात्र तयारीविनाच आल्याचं किंवा त्यांनी तयारी केलीही असेल तरी ती चुकीच्या पद्धतीनं केल्याचं आता उघड झालंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 25, 2013, 04:47 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स’मध्ये नुकतंच मोदींनी आपल्या भाषणात महाराष्ट्र सरकारवर टीका करत जोरदार टाळ्या मिळवल्या. पण, या सभेसाठी मोदी मात्र तयारीविनाच आल्याचं किंवा त्यांनी तयारी केलीही असेल तरी ती चुकीच्या पद्धतीनं केल्याचं आता उघड झालंय. एकाच रस्त्यावर असणाऱ्या महाराष्ट्रातल्या टोलची कमाईही गुजरातपेक्षा कितीतरी पटीनं कमी असल्याचं, वक्तव्य मोदींनी आपल्या भाषणात केलं होतं. पण, मोदींनी महाराष्ट्राची घेतलेली शाळा साफ चुकीची असल्याचं आता स्पष्ट झालंय.
कारण, गुजरात आणि महाराष्ट्र यांच्यात फरक खूप मोठा आहे, असा दावा नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात केला होता. भ्रष्टाचाराबद्दल बोलताना महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांतल्या स्थितीचं वर्णन नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं. आपलं म्हणणं स्पष्ट करण्यासाठी यावेळी मोदींनी दोन राज्यांना जोडणाऱ्या बॉर्डरवरच्या दोन चेकपोस्टचं उदाहरण दिलं. यातील एक चेकपोस्ट महाराष्ट्रात येतं... आणि तेच पुढे जाऊन गुजरातला जोडतं... तिथे गुजरातचं दुसरं चेकपोस्ट आहे... गुजरातच्या सीमेला लागून असलेल्या महाराष्ट्रातील अचाड इथला हा टोलनाका... याविषयी बोलताना महाराष्ट्रातील चेकपोस्टची गेल्या १० वर्षांतील कमाई आहे ४३७ कोटी रुपये, तर गुजरात चेकपोस्टची कमाई आहे तब्बल १४७० कोटी रुपये, असं म्हणत महाराष्ट्रात गुजरातपेक्षा जास्त भ्रष्टाचार बोकाळलाय असं मोदींनी म्हटलं.
मात्र, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या या टोल नाक्यावर गुजरातपेक्षा जास्त टोल वसूल होत असल्याचं आकडेवारी सांगतेय. महाराष्ट्रातील संबंधित टोलनाक्यावर सध्या ७,०५७ कोटी रुपयांचा टोल वसूल होत असल्याचं आकडेवारीनुसार समजतंय. महाराष्ट्रातील चेकपोस्टवर कर्मचाऱ्यांमार्फत काम होत असल्याने आणि तेथे भ्रष्टाचार होत असल्याने महाराष्ट्राचे किमान ११०० कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचा आरोप मोदींनी महागर्जना रॅलीत केला होता. परंतु, प्रत्यक्षात मात्र या टोलनाक्याचं ऑगस्ट २०१२मध्येच आधुनिकीकरण झालंय आणि ऑक्टोबर २०१३ पर्यंत तेथे ७,०५७ कोटी रुपयांचा महसूल जमा झाल्याचं आता समोर आलंय.
आधुनिकीकरणापूर्वी जानेवारी २०१२ ते जुलै २०१२ या अवघ्या सात महिन्यांत याच नाक्यावर २६२७ कोटी रुपये महसूल जमा होत होता. तो गुजरातमधील नाक्यावर जमा होणाऱ्या महसूलापेक्षा कितीतरी अधिक आहे.
नरेंद्र मोदींचा इतिहास ठरला कच्चा…
एवढंच नाही तर, आजवर गुजरातमध्ये १४ मुख्यमंत्री झालेत तर महाराष्ट्रात तेवढ्याच काळात २६ मुख्यमंत्री झालेत, असा अजब दावा मोदींनी आपल्या भाषणात केला होता.
यावर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी नरेंद्र मोदींचा खरपूस समचारही घेतला होता. राज्यात २६ मुख्यमंत्री झाले असं वक्तव्य करणाऱ्या मोदींचा इतिहास कच्चा आहे, असं सांगत राज्यात आत्तापर्यंत १७ मुख्यमंत्री झाले, हे त्यांनी स्पष्ट केलं होतं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.