एलपीजी सिलेंडरवर असतो ५० लाखांचा इन्शुरन्स

एलपीजी अर्थात घरगुती गॅस सिलेंडर ही सध्याच्या घडीला प्रत्येक घरातील महत्त्वाचा हिस्सा बनलाय. 

Updated: Dec 31, 2015, 10:25 AM IST
एलपीजी सिलेंडरवर असतो ५० लाखांचा इन्शुरन्स title=

नवी दिल्ली : एलपीजी अर्थात घरगुती गॅस सिलेंडर ही सध्याच्या घडीला प्रत्येक घरातील महत्त्वाचा हिस्सा बनलाय. भारतात १४ कोटीहून अधिक एलपीजी ग्राहक आहेत. तर यावर्षी तब्बल २५ लाख नवे ग्राहक झाले आहेत. मात्र अनेकदा गॅस सिलेंडरच्या चुकीच्या वापरामुळे अनेकांना प्राण गमवावा लागतो. 

मात्र कमी लोकांना हे माहीत आहे की एलपीजी गॅस सिलेंडर ग्राहकांनाही विम्याचा लाभ मिळू शकतो. गॅस सिलेंडरशी संबंधित काही दुर्घटना घडल्यास त्या व्यक्तींना ही विम्याची रक्कम मिळू शकते. तब्बल ५० लाख रुपयांपर्यंतचा त्यांना विम्याचा लाभ मिळू शकतो. 

मायएलपीजी.इनने दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी एखादी व्यक्ती एलपीजी कनेक्शन घेते त्यादरम्यान सिलेंडरसंबंधित काही दुर्घटना घडल्यास जिवित अथवा वित्तहानी झाल्यास त्या व्यक्तीला तब्बल ५० लाख रुपयांपर्यंतच्या विम्याचा लाभ मिळू शकतो. 

या दुर्घटनेतील प्रत्येक व्यक्तीमागे १० लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळते. मात्र दरवर्षाला या प्रकारच्या अपघातांमध्ये मदतनिधी म्हणून केवळ १०० कोटी रुपयांची तरतूद आहे. सिलेंडर दुर्घटनेत व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीला पाच लाख रुपयांची मदत मिळू शकते. तर जखमींना मेडिकल खर्चासाठी १५ लाख रुपयांपर्यंत मदत मिळू शकते. यात प्रती व्यक्तीला एक लाख रुपये मिळतात. 

दुर्घटनेत वित्तहानी झाल्यास एक लाख रुपयांपर्यंत नुकसानभरपाई मिळू शकते. एलपीजी सिलेंडरवरील विमा मिळवण्यासाठी दुर्घटना घडल्यास याची माहिती तात्काळ पोलीस ठाणे अथवा एलजीपी वितरकांना देणे गरजेचे असते. एफआयआर कॉपी, जखमींच्या उपचाराचा खर्चाची बिले, मृतांचे पोस्टमार्टम रिपोर्ट ही कागदपत्रे असणे आवश्यक असते. दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर संबंधित क्षेत्रातील अधिकारी दुर्घटनास्थळी भेट देतात. ही दुर्घटना एलपीजी संदर्भाक असल्यास तर संबंधित गॅस वितरक कंपनी याची माहिती विमा कंपन्यांना देते. त्यानंतर विमा कंपनी त्या रकमेसाठी दावा करते.