नवी दिल्ली : दिल्ली सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. भाजपला सरकार स्थापन करण्यास परवानगी देण्याची नायब राज्यपाल राष्ट्रपतींकडे मागणी केली आहे. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राजनाथ सिंहांच्या भेटीला गेले आहेत.
दिल्लीत सत्ता स्थापनेच्या घडामोडींनी वेग आलाय. दिल्लीत भाजपला सरकार स्थापन करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी नायब राज्यपाल नजीब जंग यांनी राष्ट्रपतींकडे केलीय. भाजप दिल्लीमधील सर्वात मोठा पक्ष आहे. त्यांना विधानसभेत एकवेळा बहुमत सिद्ध करण्याची परवानगी मिळावी असं नायब राज्यपालांनी म्हटलंय.
राष्ट्रपतींसाठी पाठवलेलं पत्र केंद्रीय गृहमंत्रालयाला मिळालंय. त्यामुळे आता दिल्लीत भाजपचं सरकार स्थापन होण्याची शक्यताय. नायब राज्यपालांच्या पत्रावर गृहमंत्रालय आज निर्णय घेण्याची शक्यता आहे. भाजपनं अजून आपल्या पक्षाला यासंदर्भात कुठलंच निमंत्रण मिळालं नसून असे काही आदेश आल्यास यावर गंभीरपणे विचार करु, अशी प्रतिक्रिया दिल्लीचे भाजप प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्यक्ष यांनी दिलीय.
या सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यासंदर्भात गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या भेटीला गेलेत. दिल्लीचे भाजप प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय आणि प्रभात झा यांनीही नितीन गडकरींची भेट घेतली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.