'गुड बाय पापा' म्हणत चिमुरडीनं दिला शहीद पित्याला मुखाग्नी

जम्मू-काश्मिरमधील उरी इथं लष्काराच्या कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या लेफ्टनंट कर्नल संकल्प कुमार शुक्ला यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. 'गुड बाय पापा', अशा भावपूर्ण शब्दांत संकल्प शुक्ला यांच्या मुलीनं मुखाग्नी दिला. 

Updated: Dec 8, 2014, 10:54 PM IST
'गुड बाय पापा' म्हणत चिमुरडीनं दिला शहीद पित्याला मुखाग्नी title=

रांची: जम्मू-काश्मिरमधील उरी इथं लष्काराच्या कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या लेफ्टनंट कर्नल संकल्प कुमार शुक्ला यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. 'गुड बाय पापा', अशा भावपूर्ण शब्दांत संकल्प शुक्ला यांच्या मुलीनं मुखाग्नी दिला. 

आठ वर्षांच्या सारानं जेव्हा आपल्या शहीद पित्याच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला तेव्हा तिथं जमलेल्या लोकांना अश्रू अनावर झाले. रांचीमधील हरमू घाट इथल्या मूळ गावी संकल्प कुमार शुक्ला यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सारा ही संकल्प कुमार शुक्ला यांची मोठी मुलगी. आपल्या वडिलांच्या पार्थिवावर अंत्यविधी सुरु असताना आठ वर्षांच्या मुलीचा चेहरा निर्विकार झाला होता. वडिल आपल्याला कायमचे सोडून गेले आहेत हे मान्य करण्यास जणू तिचं मन तयारच नव्हतं. मात्र त्यानंतर तिनंच संकल्प कुमार यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.
अंत्यविधीदरम्यान संपूर्ण परिसरात दु:खाचं सावट पसरलं होतं. दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या या वीराला अखेरचा निरोप देण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.

पत्नी प्रिया यांनाही आपल्या शहीद पतीला निरोप देता अश्रू आवरता आले नाहीत. पार्थिवावर पुष्पचक्र ठेवताना 'बाय बाय संकल्प' असं म्हणत त्यांनी या वीराला अखेरचा निरोप दिला. तर मुलगी सारानं 'गुड बाय पापा' म्हणत अग्नी दिला आणि जमलेल्या लोकांच्या अश्रूंचा बांध फुटला.

१२ डिसेंबर रोजी संकल्प कुमार शुक्ला यांना कर्नल पद देण्यात येणार होतं. मात्र शुक्रवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत संकल्प यांना वीरमरण आलं. याच भ्याड हल्ल्या सहा जवानही शहीद झाले तर सहा दशहतवांद्यांनाही कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.