www.24taas.com, झी मीडिया, पाटणा
राष्ट्रीय जनता दल अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना आज एका गंभीर अपघाताला सामोरं जावं लागलं. शुक्रवारी रात्री उशीरा त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या त्यामुळे लालूप्रसाद यादव यांच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्यात. जखमी अवस्थेत त्यांना पाटण्यातील एका नर्सिंग हॉस्पीटलमध्ये भर्ती करण्यात आलं. दोन तास उपचार केल्यानंतर त्यांना हॉस्पीटलमधून सोडण्यात आलं.
हॉस्पीटलमधून सुट्टी मिळाल्यानंतर लालूप्रसाद यांनी पत्रकारांसमोर झालेला घटनाक्रम सांगितला. जबानाबादवरून परतलेले लालू राघोपूरमधली आगीच्या घटनेत जखमी झालेल्या पीडितांना भेट देण्यासाठी निघाले होते. त्याचवेळेस एका दर्गाच्याजवळच बनलेल्या पीपा पूलजवळच्या एका खड्ड्यामुळे त्यांच्या वाहकाला गाडीवर नियंत्रण ठेवता आलं नाही आणि वाहनाच्या काचा फुटल्या. गाडीमध्ये पुढच्या सीटवर बसलेल्या लालूंच्या चेहऱ्यावर या काचा उडाल्या आणि लालू जखमी झाले. त्यांनी या दुर्घटनेमागे कुणाचा तरी हात असल्याचा संशय व्यक्त केलाय.
राजदच्या एका नेत्याच्या माहितीनुसार, अपघातानंतर लालूंना पाटणानजिकच्या एका नर्सिंग होममध्ये भर्ती करण्यात आलं. इथं त्यांच्यावर दोन तास इलाज करण्यात आले आणि सोडलं गेलं. डॉक्टरांनी लालूंना सध्या आराम करण्याचा सल्ला दिलाय.