नवी दिल्ली : ऑपरेशन म्यानमार देशहितासाठी आवश्यक होतं, अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी दिलीय.
यावेळी रिजिजू यांनी अभियानाची तोंडभरून कौतुक करतानाच सेनेच्या कामाचीही प्रशंसा केलीय तसंच सेनेचे आभारही मानलेत. स्थानिकांना या बंडखोरांमुळे नाहक त्रास सहन करावा लागतो. अशा अभियानासाठी राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता असते... अशा वेळी सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवं, असंही रिजिजू यांनी म्हटलंय.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड यांनीही या घटनेला पंतप्रधानांचे ऐतिहासिक पाऊल असून आतंकवादाला खतपाणी घालणाऱ्या शेजारी राष्ट्रांसाठी एक संदेश असल्याचं म्हटलंय.
मागील आठवड्यात 4 जूनला मणिपूरमधील चंदेल जिल्ह्यात बंडखोरांच्या हल्ल्यात 18 जवान शहीद झाले होते. त्यानंतर केंद्र सरकारनं या बंडखोरावर कठोर कारवाईचा निर्णय घेतला होता. याचाच परिणाम सेनेला बंडखोर मणिपूर आणि नागालॅन्ड सीमेवर पुन्हा हल्ला होणार असल्याची पक्की खबर मिळाली होती.
त्यानंतर म्यानमार सरकारच्या मदतीनं योजना करून सेनेने बंडखोरांच्या तळांवर हल्ला चढवला ज्यात 30 हून जास्त बंडखोर ठार झाले. यातील बरेच 4 जूनच्या हल्ल्यात सामील होते. या मोहिमेत बंडखोरांचे दोन तळ पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. 18 जवानांच्या हत्येनंतर निराश झालेल्या सेनेचे मनोबल या मोहिमेनंतर उंचावल्याचं म्हटलं जातंय. या कारवाई दरम्यान सेनेच्या MI-17 हेलीकॉप्टरचा वापर केला गेला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.