६० वर्षापासून काँग्रेसकडून देशाची फसवणूक – मोदी

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची आज उत्तर प्रदेशात पहिलीच सभा झाली. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि गांधी घराण्यावर जोरदार टीका केली.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Oct 19, 2013, 06:01 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कानपूर
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची आज उत्तर प्रदेशात पहिलीच सभा झाली. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि गांधी घराण्यावर जोरदार टीका केली. वाढती महागाई, देशाची आर्थिक समस्या याविषयांवर कधीही सोनिया गांधी, राहुल गांधी खेद व्यक्त केला का असा सवाल मोदींनी विचारला. गेल्या साठ वर्षापासून काँग्रेस देशाला धोका देत असल्याचा आरोप मोदी यांनी यावेळी केला.
ज्यांनी कधी गरिबी पाहिली नाही त्यांनी गरिबांच्या घरी जाऊन फोटो काढून शोबाजी करावी लागते अशी टीका मोदी यांनी केली. काँग्रेसपासून देशाला मुक्त करण्यासाठी काँग्रेसला मदत करणा-यांनाच संपवण्याची गरज आहे. आणि मतदान करताना आपण ते काम नक्की कराल असं आवाहन त्यांनी उत्तर प्रदेशच्या जनतेला केलं.
गेल्या साठ वर्षांपासून काँग्रेस देशाची फसवणूक करते आहे. या सरकारला हाणून पाडणे तुमच्या हातात आहे. त्यामुळे एक पाऊल उचला आणि येत्या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून द्या असे आवाहनही मोदींनी उत्तरप्रदेश जनतेला केले.
मोदी म्हणाले, "सध्या देशात काँग्रेस विरोधात संतापाचे वातावरण आहे. फसवणूक करण्यात हे सरकार तरबेज आहे. कोळसा घोटाळा देशात झालाच कसा? फाईल हरवलीच कशी? फाईल नाही, केंद्र सरकारचं हरवले आहे असेही नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधानांना यावर दोषी ठरवत या कोळसा घोटाळ्यात पंतप्रधानांचेही हात काळे झाले असल्याचे मोदी म्हणाले. उत्तरप्रदेशात गेल्या एका वर्षात पाच हजार निष्पाप नागरिक मारले गेले अशी आकडेवारी सादरकरून मोदींनी उत्तरप्रदेशाला ढासळलेल्या प्रशासनाचे प्रशस्तीपत्रक दिले. गुजरातमध्ये उत्तरप्रदेशातील तरूण येवून काम करु इच्छितो. उत्तरप्रदेशात प्रगती सरकारला करता आली नाही. त्यामुळे येथील तरुण दिशाहीन झाले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४
तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.