<B> <font color=red>जात पंचायतीचं फर्मान :</font></b> आदिवासी तरुणीवर १३ जणांकडून सामूहिक बलात्कार

एका आदिवासी तरुणीचे जातिबाहेरच्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याची शिक्षा म्हणून तिच्यावर १३ जणांनी सामूहिक बलात्कार केला.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 23, 2014, 12:20 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, सुरी (पश्चिम बंगाल)
एका आदिवासी तरुणीचे जातिबाहेरच्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याची शिक्षा म्हणून तिच्यावर १३ जणांनी सामूहिक बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे, जात पंचायतीनं ही `तालिबानी` शिक्षा सुनावली होती. दरम्यान, पीडित तरुणीची प्रकृती गंभीर अवस्थेत आहे. तिला हॉस्पीटलमध्ये ठेवण्यात आलंय.
मिळालेल्या माहितीनुसार, बीरभूम जिल्ह्यातील लाभपूरमध्ये १३ जणांनी एका २० वर्षीय आदिवासी मुलीवर सामूहिक बलात्कार केलाय. दुसऱ्या जातीच्या मुलांसोबत वैवाहिक संबंधांच्या विरोधात हे सर्व जण होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व म्हणजे १३ आरोपींना अटक करण्यात आलीय.
ही घटना मंगळवारी घडली. तरुणीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणीचे एका दुसऱ्या जातीच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. ही गोष्ट जात पंचायतील समजल्यानंतर पंचायतीनं या कुटुंबाला आर्थिक दंड ठोठावला. यावेळी कुटुंबानं दंडाची भली मोठी रक्कम भरण्यास असमर्थता दर्शविली. तेव्हा, तरुणीला शिक्षा द्यायलाच हवी, असं म्हणत जात पंचायतीनं तिच्यावर सामूहिक बलात्काराचा आदेश दिला.
सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत चौधरी यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. परंतु, या तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला... तब्बल १३ जणांनी तिच्यावर एकाच वेळेस झडप घातली, असं स्पष्ट केलंय. पोलिसांनी १३ जणांना अटक केलीय. तसंच या तरुणीचे ज्या तरुणाबरोबर प्रेमसंबंध होते त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्याच्यावर अजून कोणताही स्पष्ट आरोप लावण्यात आलेला नाही. इतर आरोपींवर सामूहिक बलात्कार आणि तरुणीला गंभीर दुखापत केल्यासंबंधी तक्रार दाखल करण्यात आलीय.
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, कांगारू कोर्टानंतर आदिवासींनी हा `लज्जास्पद` निर्णय घेतल्याचं सांगितलं... पण, खुलेपणानं या गोष्टीबद्दल बोलण्यास कुणीही तयार नाही. गंभीर बाब म्हणजे, यापूर्वीही चार वर्षांपूर्वी याच जिल्ह्यात एका आदिवासी तुरुणीला निर्वस्त्र करून गावभर फिरवलं गेलं होतं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.