पाकिस्तानला माहिती पुरवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गुप्त माहिती पुरविल्याप्रकरणी जम्मू-काश्मीरमधील पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन कऱण्यात आलेय. 

Updated: Oct 14, 2016, 11:56 AM IST
पाकिस्तानला माहिती पुरवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई title=

श्रीनगर : पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला सुरक्षा यंत्रणेतली गुप्त माहिती पुरविल्याप्रकरणी जम्मू-काश्मीरमधील पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आलंय. 

मिळालेल्या माहितीनुसार, काश्मीरमधील हिंसाचारा दरम्यान गुप्त आणि संवेदनशील माहिती या अधिकाऱ्याने एका पाकिस्तानी एजंटला दिल्याचा आरोप आहे. गुरुवारी जम्मू काश्मीरच्या पोलीस महासंचालकांनी त्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली.

पोलीस निरीक्षक तन्वीर अहमद यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. मात्र, आपण देशद्रोही नसल्याचं सांगत तन्वीर अहमद यांनी पाकिस्तानी एजंटला माहिती पुरवल्याचा आपल्यावरच्या आरोपांना नकार दिलाय. 

अहमद यांच्या म्हणण्यानुसार, फोनवर पाकिस्तानी एजंटने त्यांना आपण आर्मी कमांडर असल्याचे सांगत आपल्याकडून माहिती मिळवली. कुपवाडा आणि बारामुल्ला येथील परिसरात तैनात असलेल्या सुरक्षा व्यवस्थेची माहिती मिळवली. तसेच तन्वीर यांना एक ईमेल आयडी देत सुरक्षा व्यवस्थेबाबतची सर्व माहिती मेल करायला सांगितली. दरम्यान, तन्वीर यांचे असे म्हणणे आहे की त्यांनी ही माहिती देण्यापूर्वी एसपींकडून परवानगी घेतली होती. काश्मीरमध्ये दंगल आणि हिंसाचाराचे वातावरण असताना पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या एका अधिकाऱ्यानं नियंत्रण कक्षात फोन केला. त्यावेळी तन्वीर तेथे कार्यरत होते. 

केंद्रीय गृहमंत्रालयाने हा कॉल ट्रेस केला होता आणि काश्मीरमधील पोलीस महासंचालकांनाही या प्रकरणाची माहिती दिली. पोलीस महासंचालकांनी तात्काळ या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले तसेच अहमद यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली.