`थंड डोक्यानं रचला इशरतच्या फेक एन्काउंटरचा कट`

आरोपपत्रात म्हटल्यानुसार, पोलीस आणि मारल्या गेलेल्या चौघांमध्ये कोणत्याही प्रकारची चकमक झालीच नव्हती...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 4, 2013, 09:24 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, अहमदाबाद
इशरत जहाँ एन्काऊंटर प्रकरणात सीबीआयनं अहमदाबादच्या सीबीआय विशेष कोर्टात आरोपपत्र दाखल केलंय. इशरत जहाँचं एन्काऊंटर फेक असल्याचं या आरोपपत्रात नमूद करण्यात आलंय. या प्रकरणात सात पोलीस अधिकाऱ्यांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलंय.

असा रचला कट
अहमदाबादच्या जवळच्या परिसरात १५ जून २००४ रोजी गुजरात पोलिसांनी ‘कथित’ एन्काउंटर केलं होतं. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा इथं राहणाऱ्या इशरत जहाँ, जावेद शेख उर्फ प्राणेश पिल्लई, अमजद अली अकबर अली राणा आणि जिशान जोहर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
आरोपपत्रात म्हटल्यानुसार, पोलीस आणि मारल्या गेलेल्या चौघांमध्ये कोणत्याही प्रकारची चकमक झालीच नव्हती. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आयबीच्या अधिकाऱ्यांच्या मदतीनं १२ जून रोजी आणंद जिल्ह्यातील वसाड इथल्या एका टोल बूथवर इशरत आणि जावेद शेख याला ताब्यात घेतलं होतं. त्यामुळे ‘चकमकीत मारले गेले’ असं नमूद करण्यात आलेले आरोपी अगोदरपासूनच पोलिसांच्या ताब्यात होते. इशरत आणि जावेद यांची राजेंद्र कुमार यांनी शहराच्या बाहेर असलेल्या एका फार्म हाऊसमध्ये चौकशीही केली होती. याच फार्म हाऊसमध्ये त्यांना बंदिस्त करून ठेवण्यात आलं होतं.
‘१३ जून २००४ रोजी वंजारा, पांडेय, कुमार आणि अमीन त्या फार्महाऊसवर गेले. त्यांनीही इशरत आणि जावेदची चौकशी केली. त्यानंतर चकमकीचा कट रचण्यापूर्वी दोघांना अहमदाबादला आणलं गेलं इथं त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं. १५ जून २००४ रोजी चौघांनाही कोटरपूर वॉटरवर्क्सजवळच्या एका जागेवर (जिथं कथित चकमक झाली) तिथं आणण्यात आलं आणि चौघांचीही गोळ्या घालून हत्या करण्यात आली’ असंही आरोपपत्रात नमूद करण्यात आलंय.
रोड डिव्हायडरजवळ त्यांना शेजारी उभं करून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. एके ४७ रायफलसहित अनेक हत्यारं या ठिकाणावरून जप्त करण्यात आले आणि हे चौघेही चकमकीत मारले गेले असा दावा केला गेला. ही सर्व हत्यारं गुजरात पोलीस अधिकारी सिंघल यांनी एसआयबीकडून घेतले होते.
इशरत आणि तीचे तीन साथीदार मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हत्येसाठी गुजरातमध्ये आले होते हे स्पष्ट करणारा एकही पुरावा आपल्याला मिळाला नसल्याचं सीबीआयनं म्हटलंय. परंतु, मारले गेलेले चौघे जण दहशतवादी होते की नव्हते याचा उल्लेख मात्र आरोपपत्रात नाही. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यांचे निकटवर्तीय आणि माजी मंत्री अमित शहा यांच्य़ा नावाचाही आरोपपत्रात उल्लेख केलेला नाही.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.