www.24taas.com, झी मीडिया, अहमदाबाद
इशरत जहाँ एन्काऊंटर प्रकरणात सीबीआयनं अहमदाबादच्या सीबीआय विशेष कोर्टात आरोपपत्र दाखल केलंय. इशरत जहाँचं एन्काऊंटर फेक असल्याचं या आरोपपत्रात नमूद करण्यात आलंय. या प्रकरणात सात पोलीस अधिकाऱ्यांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलंय.
आरोपपत्रात इशरत जहाँ दहशतवाद्यांशी संबंधित असल्याचा कुठलाही उल्लेख केलेला नाही. इशरत जहाँ एन्काऊंटरप्रकरणी गुजरात पोलीस आणि आयबीचं साटेलोटे असल्याचं आरोपपत्रात नमूद करण्यात आलंय. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यांचे निकटवर्तीय आणि माजी मंत्री अमित शहा यांच्य़ा नावाचाही आरोपपत्रात उल्लेख केलेला नाही. त्यामुळं मोदींना दिलासा मिळाल्याचं मानलं जातंय.
‘१९ वर्षीय इशरत २००४ मध्ये एका ‘बनावट’ एन्काउंटरची शिकार बनली. ही गुजरात पोलीस आणि राज्याचे सब्सिडरी इंटेलिजन्स ब्युरो (आयबी)ची संयुक्त कारवाई होती’ असं स्पष्टपणे या आरोपपत्रात म्हटलं गेलंय. सध्या फरार म्हणून जाहीर करण्यात आलेले माजी डीआयजी डीजी वंजारा, पी पी पांडे आणि अनुज चौधरी यांना या प्रकरणात आरोपी करण्यात आलंय. त्यांच्यावर कट रचल्याचा आरोपही ठेवण्यात आलाय. तर आयबीचे विशेष संचालक राजेंद्र कुमार यांच्यासहीत तीन अधिकारी – पी. मित्तल, एम. के सिन्हा आणि राजीव वानखेडे यांच्या भूमिकेची चौकशी सुरू आहे, असंही आरोपपत्रात नमूद करण्यात आलंय. चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याविरद्धही आरोपपत्र दाखल करण्यात येईल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.