इंफाळ : मणिपूरचे मुख्यमंत्री ओकराम इबोबी थौबल विधानसभेच्या जागेवर निवडून आलेत. त्यांनी भाजपचे प्रतिस्पर्धी लीतानथेम बसंता सिंह यांनी धूळ चारलीय.
याच जागेवर मानवाधिकार कार्यकर्त्या इरोम शर्मिला यादेखील उभ्या होत्या. परंतु, धक्कादायक म्हणजे त्यांना केवळ 90 मतांवर समाधान मानावं लागलंय.
इबोबी यांनी बसंता सिंह यांना 10,470 मतांच्या फरकानं पछाडलंय. इबोबी यांना 18,649 मतं मिळाली तर बसंता सिंह यांना 8,179 मतं मिळालीत.
पीपल्स रिसर्जेजन्स अॅन्ड जस्टिस अलायन्स (पीआरएजेए) च्या उमेदवार शर्मिला खुराई मतदारसंघातून निवडणूक लढवत होत्या. मणिपूरमध्ये लागू असलेल्या सशस्त्र दल अधिनियम, 1958 विरुद्ध तब्बल 16 वर्ष त्यांनी उपोषण केलं. परंतु, कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं त्यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर 2016 मध्ये आपलं उपोषण मागे घेतलं... आणि राजकीय वाटेवर पाऊल टाकलं. त्यांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसून 'अफ्सपा' हटवायची इच्छा होती.