माकडाच्या हाती कोलीत... नव्हे करोडोंची संपत्ती!

उत्तर प्रदेशच्या रायबरेली जिल्ह्यात एका माकडाच्या नावे करोडोंची संपत्ती होणार असल्याचं समजतंय... होय, हे खरं आहे.

Updated: Feb 20, 2015, 04:05 PM IST
माकडाच्या हाती कोलीत... नव्हे करोडोंची संपत्ती! title=

रायबरेली : उत्तर प्रदेशच्या रायबरेली जिल्ह्यात एका माकडाच्या नावे करोडोंची संपत्ती होणार असल्याचं समजतंय... होय, हे खरं आहे.

रायबरेलीतल्या एका गडगंज दाम्पत्यानं आपली जमीन आणि संपत्ती आपल्या पाळीव माकडाच्या नावे करण्याचा निर्णय घेतलाय. 

या 'लकी' माकडाच्या आईचं दहा वर्षांपूर्वी निधन झालं होतं. त्यावेळी ब्रिेजेश श्रीवास्तव आणि त्यांची पत्नी सबिस्ता यांनी या माकडाच्या पिल्लाला दत्तक घेतलं होतं. श्रीवास्तव दाम्पत्याला कोणतंही अपत्य नाही.

200 यार्डाचा भूखंड आणि बँकेत जमा असलेली आपली सगळी संपत्ती श्रीवास्तव दाम्पत्यानं 'चुनमून' या पाळीव माकडाच्या नावे करण्याचा निर्णय घेतलाय. आम्ही चुनमूनला आमच्या अपत्याप्रमाणेच मानतो, असं या दोघांचं म्हणणं आहे. 

आपल्या मृत्यूनंतरही चुनमूनची योग्य बडदास्त राखली जायला हवी, यासाठी या दाम्पत्यानं एक ट्रस्टही बनवलीय. सामान्यत: एखाद्या माकडाचं आयुष्य 35 ते 40 वर्षांचं असतं. 

श्रीवास्तव यांच्या म्हणण्याप्रमाणे, चुनमून त्यांच्यासाठी भाग्यशाली आहे. 2004 साली जेव्हा त्यांनी चुनमूनला दत्तक घेतलं होतं तेव्हा ते खूपच गरीब होते. पण आता मात्र त्यांची परिस्थिती पूर्णपणे पालटलीय. आता त्यांच्याकडे स्वत:च घर आहे, जमीन आहे आणि बँक बचतही आहे... त्यामुळे, आपल्या या निर्णयावर लोक काय म्हणतील याची पर्वा हे दाम्पत्य करत नाही.
 
48 वर्षीय ब्रिजेशचा व्यवसाय आहे... तर 45 वर्षीय सबिस्ता वकील आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.