शांततेचा ठेका पश्चिमी राष्ट्रांकडे नाही - भाजप

सीरिया यादवी युद्धात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप आणि सैन्य कारवाई अमान्य असल्याचं, भाजपनं आज संसदेत म्हटलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 4, 2013, 03:44 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
सीरिया यादवी युद्धात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप आणि सैन्य कारवाई अमान्य असल्याचं, भाजपनं आज संसदेत म्हटलंय. ‘पश्चिमी देश जगभरात शांतिस्थापनेसाठी पोलीस बनू शकत नाहीत आणि भारत सरकारनं हा विषय ठामपणे जगासमोर मांडावा’ असं भाजपनं म्हटलंय.
लोकसभेत सीरियासंबंधी झालेल्या चर्चेदरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंह यांनी आपलं म्हणणं मांडलंय. ‘आज सीरियाचा विषय सगळ्यात विध्वंसक घटनेच्या रुपात समोर उभा ठाकलाय. तिथे कट्टरपंथीयांद्वारे प्रभावित झालेलं वातावरण सध्या यादवी युद्धाचं स्वरुप घेतंय’.
‘आता सीरियावर हल्ला करण्यासाठी पश्चिमी शक्तींकडून पार्श्वभूमी तयार करण्यात येतेय. पण, आपल्या सरकारनं मात्र यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अमेरिकेचे राष्ट्रपती सीरियावर हल्ला करण्याचा प्रस्ताव संसदेत मांडण्याच्या तयारीत आहेत. जगभरात शांतता प्रस्थापित करण्याचा ठेका पश्चिमी राष्ट्रांकडे सोपवण्यात आलेला नाही. ते जगभरात पोलीसांचं काम करू शकत नाहीत. दुर्भाग्यपूर्ण गोष्ट म्हणजे भारत सरकारनं या विषयावर उशीरा प्रतिक्रिया व्यक्त केलीय आणि जगासमोर या प्रश्नाला जोरदार विरोधही दर्शवलेला नाही’ असं भाजपनं म्हटलंय.

‘अरबी जगात सीरियाला महत्त्वपूर्ण स्थान आहे आणि इथं इस्लाम तसंच ख्रिश्चन धर्म एकत्रच वाढलाय. अशा परिस्थितीत या क्षेत्रात सैनिकी कारवाई योग्य नाही’ असं जसवंत सिंह यांनी म्हटलंय. यासोबतच पश्चिमी राष्ट्रांना अशा गोष्टींमध्ये हस्तक्षेप करण्याचा काहीही अधिकार नाही असंही त्यांनी म्हटलंय. आशिया खंडात कोरियापासून इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तानच्या काही भागांत अमेरिकेच्या सैनिकी हस्तक्षेपामुळे पेशावरपासून मोरक्कोचा भाग उद्ध्वस्त झालाय. भारत सरकारनं याविरुद्ध आपली भूमिका ठामपणे मांडायलाच हवी, असंही त्यांनी म्हटलंय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.