www.24taas.com, वृत्तसंस्था, बंगळुरू
भारताचे मंगळयान आज शनिवारी मध्यरात्रीनंतर पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडेल आणि मंगळ ग्रहाच्या दिशेने आपल्या प्रवासाला प्रारंभ करेल. हे मंगळयाळ २५ दिवस पृथ्वीच्या कक्षेत राहिले.
मंगळयान मोहिमेची प्रगती चांगली आहे. यान अतिशय चांगल्या स्थितीत आहे. त्याचे कार्यही सुरळीतपणे सुरू आहे. यानाचे काम व्यवस्थितपणे सुरू राहिले तर ३०० दिवसांनंतर हे यान मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करेल आणि भारताच्या यशस्वी मोहिमेचा डंगा अख्या जगभर होईल.
मंगळ ग्रहावरील वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी आणि तेथील जीवसृष्टीचा शोध घेण्यासोबत इतर बाबींचाही अभ्यास करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) याच ५ नोव्हेंबर २०१३ रोजी मंगळयान अवकाशात झेपावले होते. गेल्या २५ दिवसांपासून हे यान पृथ्वीच्या कक्षेत प्रदक्षिणा मारत आहे. आज रात्री १२ वाजून ४९ मिनिटांच्या सुमारास या मंगळयानाला मंगळाच्या दिशेने सोडण्याची संपूर्ण तयारी इस्रोने केलेली आहे.
४४० न्यूटन लिक्विड अॅपोजी मोटर सुरू होताच या यानाचा ‘मंगळ’ प्रवासही सुरू होणार आहे, अशी माहिती इस्रोच्या अधिकार्यांनी दिली. ३०० दिवसांच्या प्रवासानंतर हे यान जेव्हा मंगळाच्या कक्षेत येईल, तेव्हा सुरक्षितपणे या कक्षेत प्रवेश करण्याकरिता लिक्विड अॅपोजी मोटर पुन्हा सुरू करून यानाची गती कमी करण्यात येईल, असे मंगळ मोहिमेच्या प्रकल्पाचे संचालक एम. अण्णादुराई यांनी म्हटले आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.