चेन्नई : सीबीआयने काळापैसा बाळगल्याप्रकरणी व्यापारी शेखर रेड्डी यांना अटक केली आहे. याप्रकरणी सीबीआय कडक कारवाई करतांना दिसत आहे. सीबीआयने त्यांना कोर्टात हजर केलं. ३ जानेवारीपर्यंत रेड्डींना सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.
रेड्डींकडून १०६ कोटी रुपये रोख मिळाले असून त्याची कसून चौकशी होत आहे. शेखर रेड्डी यांच्याकडे इतकी रक्कम आली कशी याबाबत चौकशी होत आहे. आयकर विभागाने तमिळनाडुच्या मुख्य सचिव राम मोहन राव यांच्या घरी देखील छापा मारला आहे. छापेमारी चेन्नईमधील अन्ना नगरमध्ये करण्यात आली. राम मोहन यांचं शेखर रेड्डींशी कनेक्शन असल्याचा संशय आहे.
शेखर रेड्डींकडे १०६ कोटी आणि २७ किलो सोनं मिळाल्याने खळबळ माजली. राव आणि शेखर रेड्डी हे तमिळनाडुचे मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्या जवळचे मानले जातात. अनेक मोठ्या लोकांची नावं आता पुढे येत आहेत. चौकशीमध्ये आणखी काही मोठ्या हस्तींवर कारवाई होऊ शकते.