अहमदाबाद : गुजरात हायकोर्टानं एका १९ वर्षांच्या मुलीला तिच्या २० वर्षीय बॉयफ्रेंडसोबत लिव्ह इनमध्ये राहण्याची परवानगी दिलीय.
उल्लेखनीय म्हणजे, कायद्यानुसार मुलींसाठी विवाहाचं वय १८ वर्ष तर मुलांसाठी २१ वर्ष निर्धारित करण्यात आलंय. त्यामुळे या प्रकरणात मुलीचं वय विवाहासाठी योग्य असलं तर मुलगा मात्र विवाहासाठी अपात्र ठरतो. त्यामुळे, हे दोघं आत्ताचं विवाह करू शकत नाहीत. परंतु, ते लिव्ह-इनमध्ये राहू शकतात, असं कोर्टानं म्हटलंय.
या प्रकरणात मुलगी ही हिंदू आहे तर मुलगा मुस्लीम... आणि दोघांनाही लग्नानंतर आपला धर्म बदलण्याची इच्छा नाही. अशावेळी केवळ स्पेशल मॅरेज अॅक्टनुसार त्यांचा विवाह होऊ शकतो.
वयाच्या बंधनामुळे या दोघांनी जुलै महिन्यात 'मैत्री करारा'ला परवानगी मिळण्यासाठी कोर्टाकडे परवानगी मागितली होती. गुजरातमध्ये लिव्ह-इन-रिलेशनशिपला औपचारिक रुप देण्यासाठी 'मैत्री करार' केला जातो.
मुलानं २१ व्या वर्षात प्रवेश केल्यानंतर आपण विवाह करू इच्छितो... असं या दोघांनी म्हटलंय. तसं एक अॅफिडेव्हिट जमा करण्याचे आदेशही कोर्टानं दिलेत. परंतु, तेव्हापर्यंत मुलीला आपल्या आई-वडिलांसोबत राहायची इच्छा नाही. सप्टेंबरपासून तिच्या आई-वडिलांनी तिला आपल्याच घरात बंदी बनवून ठेवल्याचं त्यांचं म्हणणं आहे.