अहमदाबाद : पटेल आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याला आज गुजरात पोलिसांनी पुन्हा एकदा ताब्यात घेतलंय. पोलिसांनी कारवाई करू नये यासाठी हार्दिकनं आपला रॅलीचा कार्यक्रम अत्यंत गुपचूपणे तयार केला होता... पण, ही रॅली निघण्याअगोदरच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं.
अधिकाऱ्यांकडून परवानगी न घेता 'एकता यात्रे'त सहभागी होण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली हार्दिक पटेल याला अन्य ३५ समर्थकांसोबत पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलंय.
वरछा क्षेत्रातील मंगध चोकातून रॅली सुरू होण्याच्या अगोदरचं हार्दिकला ताब्यात घेण्यात आल्याचं सूरतचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी म्हटलंय. यानंतर हार्दिकला आणि अन्य अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांना पोलीस मुख्यालयात आणलं गेलं.
यावरून २२ वर्षीय नेता हार्दिक पटेलनं गुजरात सरकारवर टीका केलीय. 'आमचा आवाज दाबण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. गुजरात सरकार आणि पोलीस यांना राज्यात हिंसा हवीय. ही कारवाई लोकशाहीच्या विरोधत आहे' असं हार्दिकनं म्हटलंय.
दांडीहून अहमदाबादपर्यंत रॅली काढल्यानंतर परवानगी मिळाली नाही त्यामुळे हार्दिकनं 'एकता रॅली'ची आपली योजना कालपर्यंत गुप्त ठेवली होती... हार्दिकचा सहकारी आणि सूरतमध्ये पाटीदार अनामत आंदोलन समितीचा संयोजक अल्पेश कठिरिया यांनी वरछा क्षेत्रापासून ते मंगध चौकापर्यंत रॅली काढण्यात येणार असल्याचं जाहीर केलं होतं.
ओबीसी कोट्यातून गुजरातमधील पटेल समुदायालाही आरक्षण मिळावं, या अशी माकणी करत हार्दिक पटेलनं आंदोलन सुरू केलंय.
यापूर्वी २५ ऑगस्ट रोजी झालेल्या रॅलीत हार्दिकनं आक्रमक भाषण केलं होतं आणि त्यानंतर उसळलेल्या हिंसेत १० जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.