www.24taas.com,अहमदाबाद
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागपूरला राजकीय कारणाने आलो नसल्याचे सांगितले असले तरी काँग्रेसला धक्का देण्यासाठी त्यांनी संघ श्रेष्ठींची भेट घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच काँगेसला जबरदस्त झटका देत गुजरात काँग्रेसच्या प्रवक्त्या आसिफा खान यांना मोदींनी भाजपमध्ये आणून काँग्रेसला धोबीपछाड दिला आहे.
रविवारी मोदींनी नागपुरात येऊन संघचालक मोहन भागवत यांच्यावर केलेल्या तीन तासा चर्चा केली होती. या चर्चेचे खरे कारण आता जगासमोर आले आहे. खान यांना भाजपात प्रवेश द्यावा का यासाठीची परवानगी मिळविण्यासाठी मोदी रविवारी नागपुरात दाखल झाल्याचे समजते.
नरेंद्र मोदी यांनी गुजरातचा विकास केला परंतु, त्यांच्यावर हिंदुत्त्ववादी असल्याचा शिक्का आहे. मोदींनी आपल्यावरील हा शिक्का पुसण्यासाठी असिफा खान यांना पक्षात प्रवेश द्यायला हवा, असे मोदींना वाटत होते. हीच बाब त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना पटवून दिली असण्याची शक्यता आहे. त्यांचा होकार मिळताच दुसऱ्याच दिवशी आसिफा खान हे भाजपात डेरेदाखल झाल्या आहेत. याचबरोबर संजय जोशी आणि विश्व हिंदू परिषदेचे प्रविण तोगडिया यांच्यासह सर्वांना सोबत घेऊन निवडणुका लढवाव्यात, असेही संघाने मोदींना बजावले आहे.
आसिफा खान या जरी भाजपात आल्या असल्या तरी काँग्रेसने याला फार महत्त्व दिले नाही. अहमद पटेल यांच्या भरूच शहरात राहणा-या आसिफा अनेक वर्षापासून काँग्रेससोबत काम करीत आहेत. त्या गुजरात प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्ता म्हणून काम करीत होत्या. शनिवारीच त्या भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष आणि सूफी संत महबूब अली यांच्यासोबत भाजप कार्यालयात येऊन गेल्या होत्या. आता त्यांनी भाजप पक्षाचे सदस्य स्वीकारले असून, खासदार विजय रुपाणी यांनी त्यांचे स्वागत केले आहे.