www.24taas.com,अहमदाबाद
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान सुरु झाले आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजता कडक सुरक्षा व्यवस्थेत मतदान सुरु झाले आहे. ८७ जागांसाठी मतदान करण्यात येत आहे. यात तीन कोटी ८० लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत.
मतदानाच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार होई नये, यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत सहा टक्के मतदान झाले असल्याचे वृत्त आहे. तर नवसारी येथील एका मतदान केंद्रावरील वोटिंग मशीन नादुरुस्त झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे गुजरातचे वनमंत्री मंगूभाई यांना मात्र मतदान करता आले नाही.
पहिल्या टप्प्यात अहमदाबादसह सुरेंद्र नगर, राजकोट, जामनगर, पोरबंदर, जुनागड, अमरेली, भावनगर, राजपीपला, भरुच, सूरत, व्यारा, अहवा, नवसारी, वलसाड या पंधरा जिल्ह्यात मतदान सुरु झाले आहे. यात ८४६ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. यात ४६ महिला उमेदवारांचा समावेश आहे.
या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते अर्जुन मोढवाढीया आणि केशुभाई पटेल यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपचे ४० तर काँग्रेसचे १६ विद्यमान आमदार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.