www.24taas.com, नवी दिल्ली
बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात मुलायम सिंह यादव यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टानं गुरुवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. या निर्णयानुसार मुलायम सिंह यादव आणि त्यांचा मुलगा, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याविरुद्ध बेहिशोबी मालमत्ता प्रकरणासंबंधी सीबीआय चौकशी यापुढेही सुरू राहील.
याचवेळी न्यायालयानं अखिलेश यादव यांची पत्नी डिम्पल यादव यांच्याविरुद्ध सुरू असलेली चौकशी मात्र बंद करण्याचा आदेश दिलाय. तसंच सीबीआयनं केलेल्या चौकशीचा रिपोर्ट सरकारकडे नाही तर न्यायालयाकडे सुपूर्द करावा अशी महत्त्वपूर्ण सूचनाही न्यायालयानं सीबीआयला केलीय. सीबीआय आणि सरकार या दोन्ही भिन्न संस्था आहेत त्यामुळे यापुढेही सीबीआयनं चौकशी सुरू ठेवावी असं न्यायालयानं स्पष्ट केलंय.
२००७ साली सुप्रीम कोर्टानं मुलायम सिंह यादव, अखिलेश यादव यांच्यासहीत कुटुंबातील चार जणांच्या चौकशीचे आदेश सीबीआयला दिले होते. याच आदेशाविरुद्ध यादव कुटुंबीयांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती.