www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
मोदी सरकार इन्कम टॅक्सचे स्लॅब वाढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. त्यामुळं सामान्य करदात्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये आजवर दोन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असल्यास कोणताही कर भरावा लागत नव्हता. पण आता ती मर्यादा पाच लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. मोदी सरकार करदात्यांना दिलासा देण्याचा हा निर्णय घेणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
यासंबंधीचा अहवाल आयकर खात्याकडून केंद्रीय अर्थ मंत्रालयानं मागवला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस याबाबतचा प्रस्ताव 20 जूनला सादर करणार आहे. तसंच गृह कर्ज आणि आरोग्य विम्याच्या प्रीमियमवरही कर सवलतीची मर्यादा वाढवण्याच विचार सरकार करत आहे. आरोग्य विम्याची प्रिमियम मर्यादा पाच हजार रुपयांनी वाढवण्यात येईल असा अंदाज व्यक्त होतो आहे. सध्या आरोग्य विम्यावर 20 हजार रुपयांपर्यंत सवलत मिळते.
कर सवलतींसंदर्भात मोदी सरकारनं हा निर्णय घेतल्यास मध्यमवर्गाला मोठा दिलासा तर मिळेलच, पण त्यामुळं बचतीचा दरही वाढण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.