दिल्लीत सोन्या-चांदीच्या भावात घट

Updated: Aug 7, 2016, 01:48 PM IST
दिल्लीत सोन्या-चांदीच्या भावात घट title=
नवी दिल्ली : दिल्लीच्या सराफा बाजारातील सोन्याचा भाव अखेर 410 रूपयांनी घसरला आहे. सध्या हा भाव 31000 रूपये प्रति तोळा असा आहे. जागतिक बाजारातील मंदी आणि किरकोळ बाजारातील सोनेविक्रेत्यांची घसरलेली मागणी यामुळे ही घट झाल्याचे कळते. गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावाने दिल्लीत गेल्या 29 आठवड्यातील सर्वाधिक पातळी गाठली होती.
 
औद्योगिक संस्था आणि नाणेनिर्मात्यांची बाजारातील उचल कमी असल्याने चांदीचा भावही घसरला आहे. प्रति किलो चांदीचा भाव 47000 रूपयांवरून घसरून 46300 रूपयांपर्यंत येऊन थांबला आहे.
 
अमेरिकेतील रोजगाराची आकडेवारी सकारात्मक असल्याने अमेरिकन रिझर्वकडून व्याजदरात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली. यामुळे मौल्यवान धातूंची मागणी घटून जागतिक बाजारात मंदी दिसून येत आहे.
 
आंतरराष्ट्रीय बाजाराच्या कमकुवत स्थितीमुळे 99.9 आणि 99.5 टक्के शुद्ध सोन्याची किंमत अनुक्रमे प्रतितोळा 30,980  रुपये आणि 30,830 रूपयांनी सुरू झाली. यानंतर हा आकडा सुधारून 31,250 रुपये आणि 31,100 रुपयांपर्यंत पोहोचला. मात्र आठवड्याच्या शेवटी हा भाव अनुक्रमे प्रतितोळा 30,930 रुपये आणि 30,780  रुपयांपर्यंत येऊन थांबला.