गोव्यात पारंपरिक 'सांजाव' उत्सवाची धूम

सृष्टीत चैतन्याचा बहर आणणारा मान्सून म्हणजे जणू उत्साह पर्वच. या मान्सूनची रंगत गोव्यात अनोख्या पद्धतीनं साजरी होते. गोव्यात पारंपरिक सांजाव उत्सवाची धूम आहे.

Updated: Jun 25, 2015, 09:58 PM IST
गोव्यात पारंपरिक 'सांजाव' उत्सवाची धूम  title=

पणजी : सृष्टीत चैतन्याचा बहर आणणारा मान्सून म्हणजे जणू उत्साह पर्वच. या मान्सूनची रंगत गोव्यात अनोख्या पद्धतीनं साजरी होते. गोव्यात पारंपरिक सांजाव उत्सवाची धूम आहे.

डोक्यावर फुलांचा मुकूट चढवून, अंगावर वेलींचा साज घेऊन पाण्यात डुबकी मारणारी मंडळी, सजलेल्या होड्यांची रंगतदार स्पर्धा आणि संगीत नृत्यांचा जंगी लवाजमा अशा थाटात गोव्यात सांजाव उत्सवानं चैतन्याचे रंग भरले. या महोत्सवाचा देशीविदेशी पर्यटकांनी आनंद लुटला.

गोव्याची जीवनशैली कायमच आपलं वेगळेपण जपत आली आहे. इथलं मान्सून सेलिब्रेशनही असचं अनोखं. मान्सूनच्या आगमनाबरोबरच गोव्याच्या हवेत सांजावचे रंग भरु लागतात. नवं विवाहित जोडप्यांना पानाफुलांचा काटेरी मुकूट घालून वैवाहिक आयुष्याच्या शुभकामनेसाठी गावच्या विहिरीत डुबकी मारायला लावली जाते. ही सांजावची मूळ संकल्पना. 

सांजावच्या परंपरेत नव्या पिढीचा उत्साहही जोडला जातो आहे. शिवोली इथं सांजावच्या निमित्तानं भव्यदिव्य कार्यक्रमांची रेलचेल असते. एकीकडे अवीट कोकणी गीतांचा ताल, दुसरीकडे रंगीबेरंगी पोशाखात डोक्यावर पाणाफुलांचे काटेरी मुकूट मिरवत नदीत डुबकी मारण्याची रंगत आणि सजलेल्या होड्यांच्या भव्य स्पर्धांनी यावर्षीच्या सांजावमधेही अनोखी रंगत भरली.
 
सांजावच्या या जल्लोषात स्थानिकांच्या जोडीला पर्यटकही सहभाग नोंदवत आनंद लुटत असल्याने महोत्सव अधिकच रंगतदार बनला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.