www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेला मुंबईचा डॉन अबू सालेम नुकताच एका ट्रेनमध्ये विवाह बंधनात अडकलाय.
एका वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, अबू सालेम यानं मुंबईच्या मुंब्रा भागात राहणाऱ्या एका २७ वर्षीय तरुणीशी रेल्वेमध्येच विवाह रचलाय. ८ जानेवरी रोजी अबू सालेम याला एका पोलीस खोट्या पासपोर्ट प्रकरणाच्या सुनावणीसाठी लखनऊला घेऊन जात असतानाच रेल्वेमध्येच हा विवाह सोहळा पार पडला.
२००२ साली पोर्तुगालनं अबू सालेमला भारताकडे हस्तांतरीत केलं होतं. यावेळी त्याची पहिली पत्नी मोनिका बेदी हिलादेखील त्याच्यासोबत भारतात धाडण्यात आलं होतं. मोनिकानं मात्र आपलं अबू सालेमशी लग्न झाल्याच्या वृत्ताला नेहमीच नकार दिलाय. तब्बल १२ वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर अबू सालेम आता पुन्हा विवाहबद्ध झालाय.
सालेमशी `निकाह` करणारी ही तरुणी अनेकदा त्याच्या कोर्टातील सुनावणीच्या वेळी दिसली होती. हा `निकाह` मुंबईतूनच काझीनी फोनवर वाचला. सालेम याचा भाचा रशीद अन्सारी हा या विवाह सोहळ्याचा साक्षीदार होता. सोबतच मुंबई आणि लखनऊ पोलिसांचे दोन संचही या विवाह सोहळ्यावेळी हजर होते, असा दावा या वृत्तपत्रानं केलाय.
याबद्दल बोलण्यास मात्र अन्सारीनं नकार दिलाय. `अबू सालेमच्या व्यक्तीगत जीवनापासून मला दूर ठेवा... आम्ही जेव्हाही बोललोय ते केवळ कायदेशीर बाबींबद्दल...` असं त्यानं म्हटलंय. तर पोलिसांनी मात्र `सालेम ट्रेनमध्ये काय करतो, कुणाशी बोलतो याच्याशी पोलिसांचा काहीही संबंध नाही... पोलिसांची ड्युटी केवळ सालेमला सुरक्षित लखनऊला पोहचवण्याची आणि परत आणण्याची आहे` असं ऑफ रेकॉर्ड म्हटलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.