www.24taas.com, नवी दिल्ली
देशभरात रोमिंग शुल्कमुक्तीचा निर्णय घेणार्याb सरकारकडून दूरसंपर्क कंपन्यांना मार्चपासून याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात येणार आहेत.
यासंदर्भात सर्व कंपन्यांना दूरसंपर्क खात्याकडून लवकरच सूचना दिल्या जाण्याची शक्यता आहे. सरकारकडून मोबाइल ग्राहकांच्या दृष्टीने या क्षेत्रात अनेक सुधारणा हाती घेण्यात आल्या आहेत. यातील सर्वात महत्त्वाकांक्षी म्हणून संपूर्ण देशाचे रोमिंग फ्री योजनेवर लक्ष लागले आहे. मात्र, याला मोबाइल ऑपरेटर कंपन्यांनी विरोध केला आहे.
या कंपन्यांना एकूण महसुलातील १० टक्के महसूल हा रोमिंगमधून मिळतो. रोमिंग फ्री केल्यास यातील उत्पन्नावर पाणी सोडावे लागेल, असे या कंपन्यांनी म्हटले आहे. तसेच रोमिंग फ्रीमुळे होणारे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी कंपन्यांना कॉलच्या दरामध्ये वाढ करावी लागेल, असे मोबाइल ऑपरेटर कंपन्यांची संघटना सीओएआयने म्हटले आहे.
मात्र, सरकार रोमिंग फ्रीबाबत ठाम असून दूरसंपर्क खात्याकडून गेल्याच महिन्यात याबाबत विशेष सूचनाही काढण्यात आली आहे. यामुळे सरकारकडून मार्चपासून रोमिंग फ्री करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.