बाबासाहेबांचा मृत्यूविषयी केंद्र सरकार अनभिज्ञ

भारत सरकारकडे संविधानाचे निर्माते डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या मृत्यूच्या बाबतीत काहीही माहिती नाही. थोडं आश्चर्य वाटलं का…? पण, हे खरं आहे. माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या अर्जाला केलेल्या उत्तरात खुद्द केंद्र सरकारनंच ही कबुली दिलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 5, 2012, 01:14 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
भारत सरकारकडे संविधानाचे निर्माते डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या मृत्यूच्या बाबतीत काहीही माहिती नाही. थोडं आश्चर्य वाटलं का…? पण, हे खरं आहे. माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या अर्जाला केलेल्या उत्तरात खुद्द केंद्र सरकारनंच ही कबुली दिलीय.
आरटीआयनुसार केलेल्य अर्जाला केंद्र सरकारचे दोन मंत्रालय आणि आंबेडकर प्रतिष्ठान यांनी आपल्याकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूविषयी माहिती नसल्याचं सांगितलंय. एका मंत्रालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना तर मागितली गेलेली माहिती विबागाशी संबंधित आहे, याचीही माहिती नव्हती.
आरटीआय कार्यकर्ते आर. एच. बंसल यांनी राष्ट्रपती सचिवालयाकडे डॉ. भीमराव आंबेडकर यांचा मृत्यू कसा आणि कोठे झाला होता, याबद्दल माहिती विचारली होती. मृत्यूनंतर त्यांचा पोस्टमार्टेम करण्यात आलं होतं का? केलं असल्यास या पोस्टमॉर्टेमची एक प्रत आपल्याला मिळावी, अशीही मागणी त्यांनी या अर्जामध्ये केली होती. संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू प्राकृतिक होता की त्यांची हत्या करण्यात आली होती? त्यांच्या मृत्यूची तारीख काय? कोणत्या आयोगानं किंवा समितीनं त्यांच्या मृत्यूची चौकशी केली होती का? अशा काही प्रश्नांचाही यामध्ये समावेश होता.
राष़्ट्रपती सचिवालयानं हा अर्ज गृह मंत्रालयाकडे पाठवला होता. त्यानंतर गृह मंत्रालयानं अर्जदाराला दिलेल्या उत्तरात आपल्याकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू आणि त्यासंबंधीत कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचं उत्तर दिलंय.