www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
उत्तराखंडमध्ये पुरानं थैमान घातलं असतानाच राजधानी दिल्लीलाही पुराचा धोका निर्माण झालाय. यमुना नदीचा प्रवाह पूरपातळीपेक्षा २ मीटर जास्त आहे.
गेल्या दोन दिवसांपासून हरियाणातल्या धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येतंय. त्यामुळे यमुनेला पूर येण्याची भीती वर्तवली जातेय. खबरदारीच्या उपाय म्हणून नदीकाठच्या उस्मानपूर, यमुनाबाजार, भजनपुरा, शास्त्रीपार्क इथल्या सुमारे दीड हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय.
उत्तराखंडमध्ये झालेला जलप्रलय हा निसर्गाचा प्रकोप आहे की मानवनिर्मित आपत्ती आहे, असा प्रश्न आता निर्माण झालाय. भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनीही नेमकं याच प्रश्नावर बोट ठेवलंय. हिमालयाच्या होत असलेल्या उपेक्षेमुळेच हा कहर ओढवल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
हिमालयामध्ये विकासाचं मॉडेल नेमकं काय असावं, याचीच स्पष्टता नसल्याचा हा परिणाम असल्याचं जोशी म्हणाले. तर दुसरीकडे पर्यावरणाचा समतोल राखत पर्यटक आणि यात्रेला येणा-या भाविकांसाठी सोय करण्यात आल्याचं गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी म्हटलंय.
उत्तराखंडात पावसा तडाखा आणि गंगेचा प्रकोप अनेकांच्या जीवावर बेतलाय. अजून हजारो जण आपला जीव मुठीत घेऊन मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतला. एक कुटुंब केदारनाथच्या हॉटेलमध्ये थांबल होतं. रात्रीच्या गडद अंधारात गंगेच्या महापुरात हे हॉटेल वाहून गेलं. मात्र नशिबानं वाचवलेल्या या कुटंबानं तब्बल दोन दिवस आणि दोन रात्री टेकडीवर बसून काढल्या. अखेर लष्कारचं हेलिकॉप्टर त्यांच्यापर्यंत पोहचलं आणि त्यांचा जीव वाचला. आपल्या नातेवाईकांना भेटल्यानंतर त्यांना गहिवरून आलं.
उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी मदतकार्यात जोरात सुरू असल्याची माहिती पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिलीय. आतापर्यंत १० हजार जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय. मात्र अजून ५२ हजार जणांच्या सुटकेचे आव्हान प्रशासनासमोर आहे. लष्कराच्या २२ हेलिकॉप्टर्सच्या मदतीनं नागरिकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कालपेक्षा आज हवामान चांगलं असल्यामुळं मदत कार्याला वेग येत असल्याचंही त्यांनी सांगितलंय. मात्र रस्ते खचल्यामुळं थोडा अडथळा निर्माण होत आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.