नवी दिल्लीः भारतात तब्बल १० वर्षानंतर सत्ता परिवर्तन झालं आहे आणि त्यानंतर लगेचंच भारतात अनेक गोष्टींमध्येही परिवर्तन होण्यास सुरूवात झाली. मग ते अनेक अधिकाऱ्य़ांच्या बदल्या असो किंवा अनेक राज्यपालांचं पद काढून घेणे असो.
भारतात दर वर्षी भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला जातो. पण आता भाजपची सत्ता आल्यानंतर यावर्षी हा सन्मान कोणाला मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. हा प्रश्न चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे यावर्षी सरकारने रिझर्व बँकेच्या टाकसाळला तब्बल पाच भारतरत्न पदकं बनवण्याचे आदेश दिले आहे. म्हणजे यावर्षी एक पेक्षा अधिक भारतरत्न देण्यात येऊ शकतात.
पाच भारतरत्न पदकं बनत असल्याने आता ते कोणा कोणाला मिळू शकतात याबाबत चर्चेला उधाण आले आहे. या चर्चेत सगळ्यात आघाडीचं नाव आहे ते भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं. वाजपेयीनी आता पर्यंत 3 वेळा भारताचं पंतप्रधान पद भूषवलं आहे.
वाजपेयींनंतर दूसरं नाव चर्चेत आहे ते बनारस हिंदू विदयापीठाची स्थापना करणाऱ्य़ा मदन मोहन मालवीय यांचं. १२ नोव्हेंबर १९४६ ला ८४ वर्षाच्या वयात मदन मोहन मालवीय यांचं निधन झालं होतं.
तिसरं नाव चर्चेत येतं ते सर्वश्रेष्ठ हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद यांचं. ध्यानचंद यांनी १९२८, १९३२ आणि १९३६ च्या ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्ण पदकं मिळवून दिले आहे. ध्यानचंद यांनी ४०० पेक्षा अधिक गोल केले आहेत. ३ डिसेंबर १९७९ रोजी ७४ व्या वर्षी ध्यानचंद यांच निधन झालं.
चौथ चर्चेत नाव आहे ते चित्रकार राजा रवि वर्मा यांचं. महाभारत आणि रामायणासारखे पौराणिक ग्रंथांचे पात्र हे राजा रवि वर्मांच्या चित्रकारितेची विशेषता आहे. २ ऑक्टोबर १९०६ रोजी वयाच्या ५८ व्या वर्षी राजा रवि वर्माचं निधन झालं.
अजून तरी याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही पण या नावांची भारतरत्नासाठी चर्चा आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.