नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेचा 500 रुपयांची प्रत्येक नवी नोट छापण्यासाठी किती रुपये खर्च करते, याचा तुम्हाला अंदाजा आहे का? एका आरटीआयच्या माध्यमातून या प्रश्नाचं उत्तर समोर आलंय.
500 रुपयांची प्रत्येक नोट छापण्यासाठी आरबीआयला 3.09 रुपये खर्च येतो. यामध्ये कागद, छपाई आणि इतर खर्चाचा समावेश आहे. मुंबईचे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगाली यांनी विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देताना आरबीआयनं हे उत्तर दिलंय.
आरबीआयचे उपमहाप्रबंधक पी. विल्सन यांनी दिलेल्या माहितीनुसार, 500 रुपयांच्या एक हजार नोटा छापण्यासाठी 3,090 रुपयांचा खर्च येतो... म्हणजेच प्रत्येकी 3.09 रुपये...
गलगाली यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरबीआय नोटा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड (बीआरबीएनएमपीएल) कडून खरेदी करते. 'बीआरबीएनएमपीएल'वर नोटांची छपाई आणि पूर्तता करण्याची जबाबदारी सोपवण्यात आलीय.
उल्लेखनीय म्हणजे, नोटाबंदीनंतर सरकारनं एकूण 500 आणि प्रस्तावित 1000 रुपयांच्या किती नोटा छापण्यात येणार आहेत याचा खुलासा केलेला नाही.