मरत असताना मदत करायची सोडून चोरला मोबाईल

माणसाच्या असंवेदनशीलतेचा कळस दिल्लीतल्या रस्त्यावर बुधवारी पाहायला मिळाला.

Updated: Aug 11, 2016, 12:23 PM IST
मरत असताना मदत करायची सोडून चोरला मोबाईल  title=

नवी दिल्ली : माणसाच्या असंवेदनशीलतेचा कळस दिल्लीतल्या रस्त्यावर बुधवारी पाहायला मिळाला. दिल्लीतल्या सुभाष नगर भागातून पहाटे 5 वाजून 40 मिनीटांनी मतिबुल नाईट शिफ्ट संपवून चालत घरी जात होते. यावेळी भरदाव येणाऱ्या टेम्पोनं त्यांना जोरदार धडक मारली. 

अपघातानंतर टेम्पो ड्रायव्हरनं काही वेळ मतिबुल यांच्याकडे पाहिलं आणि मग तो निघून गेला. मतिबुल बराच वेळ जखमी अवस्थेमध्ये रस्त्यामध्ये विव्हळत होता. अनेक जणांनी त्याला पाहिलं पण कोणीही त्याची मदत केली नाही. 

काही वेळानंतर एक व्यक्ती रिक्षेतून आली आणि मतिबुल यांच्याकडचा मोबाईल उचलून घेऊन गेली. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. 

अपघाताच्या तासानंतर पोलीस तिकडे आले, पण तोपर्यंत मतिबुल यांचा मृत्यू झाला होता. मतिबुल हे पश्चिम बंगालचे रहिवासी होती. दिल्लीमध्ये ते दिवसा ई-रिक्षा चालवायचे आणि रात्री सुरक्षा रक्षकाचं काम करायचे. 

पाहा नेमकं काय घडलं दिल्लीच्या रस्त्यावर