www.24taas.com, नवी दिल्ली
दिल्ली गँगरेप प्रकरणात आजपासून साकेत फास्ट ट्रॅक कोर्टात ट्रायल सुरू होतेय. सुरुवातीला या प्रकरणातील साक्षीदारांची साक्ष नोंदविली जाईल. न्यायालयानं या घटनेतील एकमेव प्रत्यक्षदर्शी असलेल्या पीडितेच्या मित्राला साक्षीसाठी बोलावलंय तसंच इतर ४ जणांचीही यासंदर्भातील साक्ष नोंदविली जाणार आहे.
गेल्या शनिवारी न्यायालयानं पाच आरोपींवर गंभीर गुन्हे निश्चित केले होते. साक्षीदारांच्या साक्षीनंतर कोर्टानं या आरोपींना दोषी ठरवलं तर त्यांना फाशीच्या शिक्षेसारखी कठोर शिक्षाही सुनावली जाण्याची शक्यता आहे. सहावा आरोपी अल्पवयीन असल्यानं त्याच्यावर वेगळी सुनावणी होणार आहे.
१६ डिसेंबर रोजी एका चार्टर्ड बसमध्ये चढलेल्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिला गंभीर दुखापतही पोहचवली होती. त्यानंतर तिला आणि तिच्या मित्राला मारहाण करून चालत्या बसमधून खाली फेकून देण्यात आलं होतं.
सिंगापूरच्या माऊंट एलिजाबेथ हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असताना २९ डिसेंबर रोजी पीडित मुलीनं आपले प्राण सोडले होते. या घटनेनं साऱ्या देशालाच हादरवून टाकलं होतं.