'हुडहुड' चक्रीवादळचा धोका, आंध्र- ओडिशामध्ये अलर्ट

एका रंगीत चिमणीच्या नावावरून ‘हुडहुड’ हे नाव मिळालेलं चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्रच्या किनारपट्टीकडे वेगानं आगेकूच करतंय. येत्या १२ ऑक्टोबरला ते आंध्रात दाखल होण्याची तसंच या प्रदेशात शनिवारपासूनच जोरदार पर्जन्यवृष्टीची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

Updated: Oct 10, 2014, 08:07 AM IST
'हुडहुड' चक्रीवादळचा धोका, आंध्र- ओडिशामध्ये अलर्ट title=

नवी दिल्ली : एका रंगीत चिमणीच्या नावावरून ‘हुडहुड’ हे नाव मिळालेलं चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्रच्या किनारपट्टीकडे वेगानं आगेकूच करतंय. येत्या १२ ऑक्टोबरला ते आंध्रात दाखल होण्याची तसंच या प्रदेशात शनिवारपासूनच जोरदार पर्जन्यवृष्टीची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

हवामान खात्यानं जारी केलेल्या निवेदनात, गुरुवारी सकाळी हे चक्रीवादळ गोपालपूरहून दक्षिणेकडे ७८० कि.मी. तर विशाखापट्टणमहून ७७० कि. मी. दक्षिण पूर्वेकडे केंद्रित होतं. ते आता उत्तर पश्चिमेकडे सरकत असून येत्या १२ तासांत ते विक्राळ स्वरूप धारण करेल आणि २४ तासांत त्याचे हे भीषण स्वरूप अधिकच वाढेल आणि १२ ऑक्टोबर रोजी दुपारपर्यंत ते आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर दाखल होईल, असं सांगण्यात आलं आहे.

अंदमान निकोबार बेटांवर या चक्रीवादळामुळं कोणत्याही प्रतिकूल हवामानाचा पूर्व अंदाज नसल्यानं या बेटांवर डी वॉर्निंग जारी करण्यात आली आहे. मात्र, आंध्र प्रदेशच्या उत्तर भागात आणि ओडिशाच्या दक्षिण भागात ११ ऑक्टोबरच्या संध्याकाळपासूनच पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे.
काही भागात जोरदार पर्जन्यवृष्टीची तर काही भागात भीषण वृष्टीची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळं रस्ते आणि रेल्वे वाहतूक, वीज आणि संपर्क यंत्रणा प्रभावित होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

केंद्रानंही केली तयारी

येत्या दोन-तीन दिवसांत आंध्र आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर येऊन आदळणाऱ्या हुडहुड या चक्रीवादळाला सामोरे जाण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रबंधन समितीची बैठक गुरुवारी दिल्लीत घेण्यात आली.

या बैठकीत या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी केलेल्या तयारीची पाहणी करण्यात आली. मंत्रिमडळाचे सचिव ए. के. सेठ यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या बैठकीत राज्याच्या सर्व मुख्य सचिव आणि विभागांना चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलण्याचे निर्देश देण्यात आलेत. हवामानखात्याच्या अंदाजानुसार हे वादळ १४० कि.मी. या वेगानं पुढं सरकत आहे.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.