नवी दिल्ली : मोदी सरकारच्या काळात पहिल्यांदाच भारतानं केलेली सर्जिकल स्ट्राईक सार्वजनिक झाली... त्यानंतर अगोदरच्या काँग्रेस सरकारच्या काळात सर्जिकल स्ट्राईक झाल्या होत्या की नव्हत्या यावरून बराच वाद झाला. त्यानंतर आता मात्र या मुद्द्यावर केंद्र सरकारनं अधिकृतरित्या आपली भूमिका स्पष्ट केलीय.
परदेशी प्रकरणांशी निगडीत संसदीय समितीला दिलेल्या माहितीत सरकारनं, पाकिस्तान अधिकृत काश्मीरमध्ये याआधीही सर्जिकल स्ट्राईक झाली होती पण एका मर्यादेपर्यंतच... असा खुलासा केलाय.
परदेश सचिव एस जयशंकर यांच्या म्हणण्यानुसार, सरकारनं पहिल्यांदाच ही माहिती सार्वजनिकरित्या दिलीय. यापूर्वी सीमा पार करण्यात आली होती किंवा नाही, याबद्दल केवळ सैन्यालाच माहिती आहे आणि अशा कारवाईबद्दल कोणताही 'संदेश' देण्यात आला नव्हता, असंही त्यांनी म्हटलंय.
यापूर्वी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी 29 सप्टेंबरच्या हल्ल्यापूर्वी भारतीय सेनेनं कधीही कोणतीही सर्जिकल स्ट्राईक केल्याचं आपल्या तरी ऐकिवात नाही, असं म्हटलं होतं. याआधी सेनेनं जी काही कारवाई केली होती ती कमी तीव्रतेची होती... आणि या कारवाया गुप्त होत्या... त्यांचा रिपोर्ट नंतर अधिकाऱ्यांना दिला जात होता... ही पहिलीच वेळ होती जेव्हा या पद्धतीच्या हल्ल्याला सरकारनं मंजुरी दिली होती.