सूरत : एका एमबीए झालेल्या तरूणाला केवळ मुस्लिम असल्यानं नोकरी नाकारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत घडल्याचं उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर, 'हरेकृष्णा एक्सपोर्टस् प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीवर धार्मिक भेदभाव केल्याचा खटला दाखल करण्यात आलाय.
झिशान खान... नुकताच तो एमबीए झाला... आणि नोकरीसाठी बीकेसी इथल्या हरेकृष्णा एक्स्पोर्टस प्रायव्हेट लिमिटेड या खासगी डायमंड एक्स्पोर्ट कंपनीत त्यानं अर्ज केला. पण तिथं त्याला जो अनुभव आला, तो शॉकिंग होता... आम्ही केवळ बिगर मुस्लिम उमेदवारांनाच नोकरी देतो, असा रिप्लाय कंपनीकडून झिशानला मिळाला. केवळ मुस्लिम आहोत, म्हणून नोकरी नाकारण्यात आल्यानं झिशान अस्वस्थ झालाय. याप्रकरणी त्यानं संबंधित कंपनीविरूद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय.
धक्कादायक म्हणजे, ही तीच कंपनी आहे जिथे गेल्या वर्षी १२०० कर्मचाऱ्यांना बोनसमध्ये कार, फ्लॅट आणि हिऱ्याचे दागिने भेट म्हणून देण्यात आले होते. या कंपनीचे मालक आहेत सावजी ढोलकिया... आरोप सिद्ध झाले तर या गुन्ह्यासाठी तीन वर्षांची शिक्षाही होऊ शकते.
दुसरीकडे झिशाननं अल्पसंख्यांक आयोगाचाही दरवाजा ठोठावलाय. मुस्लिम असल्यानं नोकरी नाकारण्यात आल्याच्या या प्रकारानं सोशल मीडियातही खळबळ उडालीय. मुस्लिम समाजातूनही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होतेय.
दरम्यान, राज्य सरकारनंही या प्रकाराची गंभीर दखल घेतलीय. असा प्रकार खपवून घेणार नाही, असा इशारा अल्पसंख्याकमंत्री एकनाथ खडसे यांनी दिलाय.
धर्माच्या नावावर नोकरी नाकारण्याचा हा प्रकार निंदाजनकच आहे. आपली मानसिकता कधी बदलणार, हा खरा सवाल आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.