अणु कराराचे व्यावसायिक परिणाम लवकरच, मोदींचे सूचक विधान

भारतासोबतच्या नागरी अणु करारात अडथळे आणणाऱ्या दोन महत्त्वाच्या मुद्यांवर आज दोन्ही देशांची सहभाती झाली असे सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अणु करार मार्गी लागण्याचे संकेत दिले आहे.  

Updated: Jan 25, 2015, 09:25 PM IST
अणु कराराचे व्यावसायिक परिणाम लवकरच, मोदींचे सूचक विधान  title=

नवी दिल्ली: भारतासोबतच्या नागरी अणु करारात अडथळे आणणाऱ्या दोन महत्त्वाच्या मुद्यांवर आज दोन्ही देशांची सहभाती झाली असे सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अणु करार मार्गी लागण्याचे संकेत दिले आहे. भारताला संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व मिळावं यासाठी आम्ही पाठिंबा देऊ, असं आश्वासनही त्यांनी दिलं. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे तीन दिवसाच्या भारत दौऱ्यावर असून आज दुपारी हैद्राबाद हाऊसमध्ये ओबामा आणि मोदी यांच्यात सुमारे दीड ते दोन तास चर्चा झाली. या चर्चेनंतर ओबामा आणि मोदी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मोदींनी व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून भारत दौऱ्यावर आल्याबद्दल ओबामांचे आभार मानले. 

दोन्ही देशांमधील नैसर्गिक संबंध असून  संरक्षण, उत्पादन या क्षेत्रात दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करतील असं मोदींनी सांगितलं. दहशतवादाविरोधात लढण्यात दोन्ही देशांमध्ये एकमत असल्याचा पुनरुच्चार मोदींनी केला. तर ओबामा यांनीही भारतीयांच्या आदरातिथ्यामुळं भारावून गेल्याचं सांगितलं. भारतासोबतचे संबंध नव्या उंचीवर न्यायचे आहेत असेही त्यांनी नमूद केलं. 

ओबामांच्या या दौऱ्यात अणु करार मार्गी लागेल अशी चर्चा आहे. याविषयी ओबामांनी सकारात्मक विधान केलं. दोन्ही देशांमध्ये अणु करारातील दोन महत्त्वाच्या मुद्यांवर सहमती झाल्याचं त्यांनी सांगितलं. संरक्षण, उर्जानिर्मिती, सौरउर्जा या क्षेत्रांविषयी भारतासोबत सहकार्य करु असं त्यांनी सांगितलं. तर नागरी अणु कराराचे व्यावसायिक परिणाम आता दिसून येतील असं सूचक विधान मोदींनी केलं.
 
हिंदीचा वापर 
नमस्ते, नमस्कार, भारतवासीयों को मेरा प्यार भरा नमस्कार असे सांगत त्यांनी भाषणाची सुरुवात केली. 'चाय पे चर्चा' या हिंदी शब्दाचा वापर करुन त्यांनी भारतीयांवर स्वतःची छाप पाडण्याचा प्रयत्न केला. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.