नवी दिल्ली : रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर येथील माडबन अणुऊर्जा प्रकल्पात आता दोन ऐवजी सहा अणुभट्ट्या उभारण्यात येणार आहेत. तसा नवा करार फ्रान्सबरोबर करण्यात आलाय.
यापूर्वी भारत दोन अणुभट्ट्या विकत घेणार होता. उभय देशांदरम्यान या प्रकल्पाबाबत चर्चा होऊन २०१६ म्हणजेच या वर्षअखेरीपर्यंत तो पूर्ण करून २१०७मध्ये या प्रकल्पाच्या अंमलबजावणीस सुरुवात करण्याचेही ठरविण्यात आलेय.
फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा ओलॉंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज व्यक्तिगत पातळीवर आणि मर्यादित सहकाऱ्यांसह सुमारे एकतास स्वतंत्र चर्चा झाली. त्यानंतर शिष्टमंडळ पातळीवर दीड तासाहून अधिक वेळ चर्चा झाली.
काल चंडीगडमध्ये उभय देशात सोळा तर आज १४ मिळून तीस करारांवर सह्या करण्यात आल्या. जैतापूरच्या संदर्भात फ्रान्सची 'इडीएफ' ही विद्युतनिर्मिती कंपनी आणि भारताच्या अणुवीज महामंडळादरम्यान आज करार आला. त्यानुसार जैतापूर येथे सहा 'युरोपियन प्रेशराइज्ड रिऍक्टर्स' (इपीआर) उभारण्याचे निश्चित करण्यात आलेय.
सहा अणुभट्ट्यांबाबत परराष्ट्र सचिव जयशंकर म्हणालेत, यात वेगळे किंवा गैर असे काही नाही. भारताला कोळसा किंवा खनिज तेलाच्या आधारे निर्मित विजेपासून सुटका हवी असल्यास आणि स्वच्छ व प्रदूषणविरहित ऊर्जेसाठी आण्विक ऊर्जा हाच प्रमुख उपाय व पर्याय आहे आणि त्या दृष्टीने भारत सरकारने हा निर्णय घेतला आहे.
जैतापूर प्रकल्प होणार गतिमान
भारत-फ्रान्स दरम्यान जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनानुसार, दोन्ही नेत्यांनी जैतापूर प्रकल्पाबाबतची बोलणी गतिमान करण्यासाठीच्या मार्गदर्शक योजनेला (रोडमॅप) मंजुरी दिली. त्यानुसार,२०१६ म्हणजेच चालू वर्षाच्या अखेरीपर्यंत बोलणी पूर्ण करून प्रकल्पाची अंमलबजावणी २०१७ पासून सुरू करण्याचे ठरविण्यात आले.
या समझोता करारानुसार जैतापूर प्रकल्पासाठी आवश्यकता असलेल्या सुटे भाग व इतर तांत्रिक गरजांची पूर्तता भारतातील स्थानिक कारखान्यांकडून करण्याची तरतूद आहे. ही उपकरणे, सुटे भाग यांची स्थानिक पातळीवर म्हणजेच भारतातच निर्मिती करण्यास फ्रान्सने मंजुरी दिली आहे.